
बेळगाव : बेळगावमधील सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना आज पोलिसांनी अटक केली आहे.
ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, ऊसाला हमीभाव देण्यासाठी आंदोलने सुरु आहेत. गेल्या १५ दिवसांपासून ऊसाला ५५०० रुपये प्रतिटन प्रमाणे दर देण्याची मागणी करत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून, आज बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
यावेळी घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखून त्यांना ताब्यात घेतले आहे. हत्तरगी येथील हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्यात आल्याने पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून बेळगावमध्ये आंदोलनासाठी आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. उसाला प्रतिटन ५५०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
गेल्या पंधरवड्यात ऊसाला हमीभाव देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शेतकऱ्यांनी अहोरात्र धरणे आंदोलन छेडले. दरम्यान, साखर मंत्री शंकर पाटील मुनेन्कोप्प यांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली. मात्र सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने तसेच शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्र घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta