वर्धापन दिन व शेतकरी मेळावा उत्साहात
उचगाव : श्री गणेश दूध संकलन केंद्राने अल्पावधीतच गरुडझेप घेऊन एक वेगळा ठसा उमटविला आहे. फक्त दूध संकलन न करता दुधापासून अनेक चवदार पदार्थ बनवून ते कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यात पोचविले आहेत. दर्जेदारपणामुळे केंद्राचे नाव सर्वतोपरी झाले आहे, असे गौरवोद्गार पशुवैद्यकीय खात्याचे सहाय्यक संचालक डॉ. आनंद पाटील यांनी काढले.
श्री गणेश दूध संकलन केंद्राचा वर्धापन दिन व शेतकरी मेळावा बुधवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला रोडवरील आरजेडी सभागृहात झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. केंद्राचे संस्थापक मोतीराम देसाई अध्यक्षस्थानी होते. पशुपालन सल्लागार अरविंद पाटील, रुक्मिणी देसाई, ग्रामपंचायत अध्यक्ष जावेद जमादार, प्रसन्न शिंदे, मधु बेळगावकर, योगिता देसाई, एल. डी. चौगुले, एन. ओ. चौगुले, ऋचा पावशे, डॉ. प्रताप पावशे आदी व्यासपीठावर विराजमान होते.
केंद्राचे संचालक उमेश देसाई यांनी प्रास्ताविक केले.
श्री.पाटील यांनी शेतकऱ्यांना पशुपालनाविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध संस्था व ग्रामपंचायतीतर्फे उमेश देसाई व सुधाकर करटे यांचा सत्कार करण्यात आला. सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांना तिजोरी व नावगे येथील बेळगावकर कुटुंबीयांना सोन्याचे नाणे देऊन गौरविण्यात आले. सर्व दूध संस्थांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाला अरुंधती देसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. वैभवी सरनोबत यांनी सूत्रसंचालन केले तर किरण देसाई यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta