बेळगाव : 2018 पासून दोन गटात विखुरलेली खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या काही महिन्यांपासून समितीमधील निष्ठावंतांनी एकीची प्रक्रिया चालू केली होती. मात्र काही नेत्यांच्या आढमुठेपणामुळे एकीची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती. समिती बळकट करण्यासाठी एकी करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे तालुक्यातील समितीप्रेमी जनतेच्या मागणीवरून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने एकीसाठी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत त्रिसदस्यीय कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीच्या माध्यमातूनच ही एकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर घटक समितीच्या एकीची धुरा आपल्याकडे घेतल्यामुळे या प्रक्रियेला बळ आले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील समितीप्रेमी जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
मध्यवर्तीने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय कमिटीमध्ये मध्यवर्ती म. ए. समितीचे उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे तसेच ऍड. एम. जी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकीच्या प्रक्रियेत त्रिसदस्यीय कमिटीने घेतलेले निर्णय अंतिम ठरणार आहेत. ही एकीची प्रक्रिया मध्यवर्तीने गठीत केलेली त्रिसदस्यीय कमिटी तसेच खानापूर तालुका समितीमधील दोन्ही गटाचे ज्येष्ठ नेते यांच्या मार्फत ही एकीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी झाली तर मराठी माणसाची ताकद वाढणार असल्यामुळे एकंदर राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे खानापूर तालुक्यातील मराठी जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. विखुरलेली समिती एकसंघ झाल्यामुळे समितीची पिछेहाट झालेली आहे तिथे समिती नव्या जोमाने उभारी घेऊ शकेल यात तिळमात्र शंका नाही.
ज्या पद्धतीने खानापूर समिती एकसंघ करण्यासाठी मध्यवर्तीने पुढाकार घेतला आहे त्याच पद्धतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव शहरासह ग्रामीण, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण सीमाभागात अश्या प्रकारे मराठी माणसांना एकत्रित करून राष्ट्रीय पक्षाच्या आमिषाना बळी पडलेल्या युवकांना समितीच्या मुख्य प्रवाहात आणले तर हा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच समितीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta