बेळगाव : श्रीक्षेत्र वैजनाथ देवस्थान देवरवाडी (ता. चंदगड) येथे सप्तशतकोतर रौप्य महोत्सवी समाधी उत्सवानिमित्त एक दिवशीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे ध्वजारोहण आणि उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आर. एम. चौगुले म्हणाले, मंदिरे ही आमची शक्तिस्थानी असून, त्या ठिकाणी आम्हाला उर्जा मिळते. सर्व वारकरी बंधु एकत्र येऊन पारमार्थिक चिंतनातून सदविचारांची देवाण घेवाण घडते आणि आपल्या उपासनेला बळ येते, सर्वाची उन्नती होते हा एकमेव उदात्त हेतू यामागचा आहे. वारकरी संप्रदाय यांनी समाज घडवण्यासाठी मोठा त्याग केलेला आहे. आजच्या पिढीने त्यांच्या वाणीचा आदर्श समोर ठेवून कार्य करणे खूप गरजेचे आहे. संताचे आचरण संताचे विचार मनात ठेवून जर आपण आपली वाटचाल केली तर आपण जीवनात सदैव यशस्वी होऊ शकतो, असे विचार महाराष्ट्र समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले.
यावेळी एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर, तसेच ह. भ. प. गुरुवर्य भाऊसाहेब पाटील ह. भ. प. गुरुवर्य पूर्णानंद काजवे महाराज कोगनोळी, ह. भ. प. गुरुवर्य अमोल महाराज घुगे अकोला, ह. भ. प. गुरुवर्य संतोष महाराज सहस्त्रबुद्धे सांगली, ह. भ. प. गुरुवर्य दिगंबर महाराज नरवडे आळेफाटा, ह. भ. प. गुरुवर्य श्रीकांत महाराज पातकर पुणे, ह. भ. प. गुरुवर्य राजेंद्र महाराज दहिभाते पुणे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कीर्तन महोत्सवचे आयोजन बेळगाव परिसरातील समस्त वारकरी परिवाराच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta