बेळगाव : शहरातील सुभाषचंद्रनगर येथील सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेने बांधलेल्या समुदाय भवनाचा 11 वा वर्धापन दिन भरगच्च कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
समुदाय भवन सभागृहात आयोजित वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रारंभी राधिका तेंडुलकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपाध्यक्ष चंद्रशेखर ईटी यांनी प्रास्ताविक केले तर खजिनदार गजानन राणे यांनी सदर कार्यक्रमास आर्थिक हातभार लावलेल्या देणगीदारांची माहिती दिली. यावेळी पुष्पाताई पाटील व भगिनींच्या साई भजनी मंडळाने एकापेक्षा एक सरस अशी भजने सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळवली. वर्धापन दिनाचे औचित्य साधून दरवर्षी सुभाषचंद्रनगर येथील 75 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांचा तसेच दहावी आणि बारावी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा संघटनेतर्फे सत्कार केला जातो यावर्षीचे अमृत महोत्सवी सत्कारमूर्ती पांडुरंग व राजाभाऊ चौगुले यांचा विशेष परिचय संघटनेचे माजी अध्यक्ष प्रकाश गोखले यांनी करून दिला. त्यानंतर पांडुरंग चिटणीस यांचा सपत्नीक सत्कार संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव व अस्मिता गुरव यांनी केला. त्याचप्रमाणे राजाभाऊ चौगुले यांचा सपत्नीक सत्कार चंद्रशेखर ईटी व विद्या ईटी यांनी केला. त्यानंतर दहावी परीक्षेत उज्वल यश मिळवलेल्या ओंकार गुरव व प्राची उचगावकर या विद्यार्थ्यांचा आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अप्पासाहेब गुरव यांनी सुभाषचंद्रनगर नागरीक संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. संघटनेचे सेक्रेटरी राजेश तेंडुलकर यांनी आभार प्रदर्शन केले. सत्काराच्या कार्यक्रमानंतर बेळगाव मधील प्रज्ञा कापसे व त्यांचे सहकारी विनायक यांच्या गीत गायनाचा बहारदार कार्यक्रम झाला. जॉ. सेक्रेटरी अविनाश खन्नूकर यांनीही यावेळी सुरेल हिंदी गाणे गाऊन उपस्थितांची मने जिंकली. संघटनेचे माजी अध्यक्ष खनगांवकर यांनी संघटनेच्या कार्यावर स्वतः तयार केलेली कविता गाऊन दाखविली. अखेर स्नेहभोजनानंतर वर्धापन दिन सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्याचे सूत्रसंचालन राधिका तेंडुलकर व विद्या ईटी यांनी केले. सदर सोहळ्यास सुभाषचंद्रनगर येथील सर्व थरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वर्धापन दिनानिमित्त समुदाय भवनाला नयन मनोहर दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. स्थानिक महिलांनी रेखाटलेल्या सुंदर रांगोळ्या व दीपोत्सवामुळे वर्धापन दिनाची शोभा अधिकच वाढली होती.
Belgaum Varta Belgaum Varta