बेळगाव : विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे बेळगावातील राजकारण रंगू लागले आहे. प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळखले जाणारे रमाकांत कोंडुसकर समितीच्या संपर्कात येताच राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. रमाकांत कोंडुसकर हे जनतेतील नेते म्हणून ओळखले जातात. रस्त्यावरील त्यांची ताकद प्रचंड आहे. रमाकांत हे युवा कार्यकर्त्यांतून लोकप्रिय असणारे असे नेते आहेत.
मराठी माणसांसाठी त्यांचे कार्य चालू झाले असतानाच कांही राष्ट्रीय पक्षातील नेते मंडळी त्यांच्या कारकिर्दीला ग्रहण लावण्यासाठी सरसावले आहेत. जुने व्हिडिओ, फोटो वापरून लोकांच्या मनात संशयाचे वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांच्याकडून होऊ लागला आहे.
आठ वर्षांपूर्वी रमाकांत कोंडुसकर व राष्ट्रीय पक्षाचे आमदार एका वास्तुशांतीच्या कार्यक्रमात गेले असता एकत्र जेवलेला फोटो काढून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यात आला आहे. या फोटोसंदर्भात खुलासा देताना रमाकांत कोंडुसकर यांनी हा फोटो कधी आणि कुठे कशा पद्धतीने काढला गेला त्याचाही पुराव्यासहित खुलासा केलेला आहे. काही प्रमाणात लोकांच्या मनातला संभ्रम दूर झाला असला तरी पुढील काळात वेगवेगळ्या पद्धतीने रमाकांत कोंडुसकर यांना अडवण्याचे निश्चितच
प्रयत्न केले जातील. रमाकांत कोंडुसकरांचा झंझावात आता विरोधकांनाही असह्य होत चालला आहे. समितीच्या माध्यमातूनही त्यांचे काम आता चालू आहे. त्यामुळे साहजिकच मराठीची ताकद वाढू लागली आहे. हे विरोधकांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या काळ्या कृत्यांना सुरुवात झाली.
निवडणूकीच्या तोंडावर अशा पद्धतीचे फोटो व्हायरल करण्याचे गौडबंगाल काय हे बेळगावकर जनता चांगलेच जाणून आहे.
रमाकांत कोंडुसकर आगामी काळात राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला तगडे आव्हान देऊ शकतात हे ओळखल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अशा कारवायाची मोहीम चालू करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. लोकांचा रमाकांत कोंडुसकर यांच्यावरचा विश्वास दृढ आहे.
अनेक हिंदुत्ववादी लढ्यात रमाकांत अग्रभागी असल्यामुळे साहजिकच हिंदुत्ववादी तरुण मोठ्या प्रमाणात रमाकांत कोंडुसकरांच्या पाठीशी उभे राहतात. त्याचबरोबर आता मराठीचा झेंडाही त्यांनी हाती घेतल्यामुळे समितीही त्यांच्या पाठीशी उभे राहत आहे. यावरून एक बाब लक्षात येते की, रमाकांत यांच्यासारखं तगडे आव्हान ज्यावेळी उभे राहतं त्यावेळेस साहजिकच राष्ट्रीय पक्षांना चिंता वाटू लागते आणि यातूनच अशा प्रकारच्या गैर प्रचारांना सुरुवात होते.
मराठी माणसाच्या पाठबळावर मैदानात उतरू पाहणारे रमाकांत व राष्ट्रीय पक्षातून लढणारे उमेदवार त्याचबरोबर काही स्वयंघोषित उमेदवार यांच्यातील लढत पाहणे बेळगावकरांसाठी रंजक ठरणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta