रयत संघटनेचा पवित्रा : दर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच
निपाणी (वार्ता) : ऊसाला प्रतिटन ५५०० रुपये मिळावे यासाठी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांचे तीन महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. पण या मागणीकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. ऊस दरप्रश्नी कारखानदारांनी एकजूट केली असून त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे आक्रमक बनलेल्या रयत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. १६) बेळगावात साखर आयुक्तालयास टाळे ठोकले. या आंदोलनामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र कारखानदार आणि सरकारकडून योग्य दर मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.
यावर्षीचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड महिना लोटला तरी शेतकऱ्यांसह रयत संघटनेच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले. यंदा ऊसाला कारखानदारांनी साडेतीन हजार रुपये तर कारखान्यांनी दोन हजार रुपये दर द्यावा या मागणीसाठी संघटनेतर्फे साखरमंत्र्यांसोबत बैठकही घेण्यात आली. यात साखरमंत्र्यांनी कारखानदारांना दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, असे आदेश देऊनही कारखानदाराने याकडे दुर्लक्ष करत गळीत हंगाम सुरूच ठेवला आहे. तसेच राजकारणात एकमेकांच्या विरोधात असलेले कारखानदार ऊस दर प्रश्नी मौन पाळले आहेत, असा आरोप करत रयत संघटनेतर्फे आंदोलन छेडले आहे
महिनाभर आंदोलन करूनही मुख्यमंत्री तसेच साखरमंत्र्यांनी अद्याप याबाबत योग्य तोडगा काढला नसल्याने संतापलेले संघटनेचे पदाधिकारी बुधवारी (ता.१६) बेळगावात गणेशपुर रोडवरील साखर आयुक्तालयात गेले. यावेळी साखर आयुक्त नसल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आयुक्तालयास टाळे ठोकले. त्यानंतर साखर कारखानदार तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन तीव्र होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
कारखानदारांनी जाहीर केलेला दर तटपुंजा असून अपेक्षित दर वेळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, जिल्हाध्यक्ष राजू पोवार, राघवेंद्र नाईक, बाबासाहेब पाटील, प्रकाश नाईक, रवी सोपन्नावर, सुभाष शिरगुर, शिवानंद मुगलीहाळ, अनंत पाटील, चिनू कुळवमोडे, सर्जेराव हेगडे, बाळासाहेब पाटील प्रा. हालप्पा ढवणे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta