बेळगाव : राष्ट्रीय पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महापालिकेच्या महसूल, आरोग्य, व बांधकाम विभागाचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक स्थायी समिती सभागृहात झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.
नूतन नगरसेवक व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केली. नवनिर्वाचित नगरसेविकांकडून त्रास होत आहे. नगरसेवक महापालिकेच्या विभागीय कार्यालयात ठाण मांडून बसत आहेत. त्यांच्याकडून आलेली कामे झाली नाहीत तर अरेरावी केली जाते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना तर याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय पक्षाचे नगरसेवक स्वतःच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची हजेरी घेत आहेत. त्यांना रजा घ्यायची असेल तरी देखील नगरसेवकांची परवानगी घ्यावी लागत आहे, अशी तक्रार बैठकीत करण्यात आली.
नगरसेवक आपल्या प्रभागाव्यतिरिक्त इतर प्रभागातील कामे करण्यास कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे संघटनेने ही समस्या गांभीर्याने घ्यावी. पालिका आयुक्त रुद्रेश घाळी यांच्याशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
Belgaum Varta Belgaum Varta