बेळगाव : कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या 23 नोव्हेंबरच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 21 नोव्हेंबर रोजी उच्चाधिकार समितीची बैठक होणार आहे. सदर बैठक दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहात होणार आहे.
23 नोव्हेंबर रोजी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्याआधीची ही बैठक महत्वाची असणार आहे. याशिवाय सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीची पुनर्रचना केली आहे. त्यामध्ये चौदा जणांचा समावेश आहे.
उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यामध्ये अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार राजेश क्षीरसागर, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा समावेश आहे.
या समितीला सीमाप्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने योग्य त्या कार्यवाहीची दिशा ठरवणे आणि त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असणार आहेत. सोमवारी सह्याद्री राज्य अतिथीगृहात ही महत्वाची बैठक होणार आहे. त्याकडे समस्त सीमावासीयांचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीची पुनर्रचना करून सोमवारी बैठक आयोजित केल्यामुळे मध्यवर्ती म. ए. समितीने सरकारचे आभार मानले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta