बेळगाव : राज्यातील शाळांच्या खोल्यांना भगवा रंग देण्याच्या सरकारच्या आदेशाविरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या बेळगाव शाखेतर्फे आंदोलन करण्यात आले.
कर्नाटकातील सत्ताधारी भाजप सरकारने आता विवेक योजनेंतर्गत शासकीय शाळांना भगवा रंग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसप्रणित एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाच्या विरोधात बेळगावात आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी बोलताना एनएसयूआयचे प्रदेश सरचिटणीस सिद्दीक अंकलगी यांनी सांगितले की, राज्यातील अनेक सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्या पुरविण्याला प्रथम सरकारने प्राधान्य द्यावे. शाळा खोल्या रंगवायच्याच असतील तर त्या आपल्या राष्ट्रध्वजाच्या रंगाने रंगवाव्यात. जर तुम्ही इतकेच देशभक्त असाल तर आमचा राष्ट्रध्वज भगवा, पांढरा, हिरवा रंगवा. नसेल तर आपल्या राज्याच्या ध्वजाचा पिवळा लाल रंगाने रंगवा. मग तुम्हाला कळेल तुमचा स्वाभिमान किती आहे. शैक्षणिक संस्थांमधील भगवेकरण थांबवले नाही, तर आगामी काळात तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. भरमू कुर्ली, संगनगौडा पाटील, पजन रेणू आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta