खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने माजी आमदार व अध्यक्ष दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते मंडळींची भेट घेऊन कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्न व्यवहार्य तोडगा काढून निकालात काढावा अशी मागणी केली. या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री. शरदचंद्रजी पवार, दोन्ही सीमा समन्वयक मंत्री श्री. छगनजी भुजबळ व श्री. एकनाथजी शिंदे, जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील, महसूलमंत्री श्री. बाळासाहेब थोरात, गृह निर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड, राज्यसभा खासदार सुप्रियाताई सुळे, उद्योग आणि मराठी भाषा विकास मंत्री श्री. सुभाष देसाई, सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. पण त्यांच्या नावाचे निवेदन मा. राऊत साहेब यांना देण्यात आले आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. या दौर्यात अध्यक्ष व माजी आमदार दिगंबरराव पाटील, सचिव आबासाहेब दळवी, भुविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, नारायण कापोलकर हे सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.