बेळगाव : बेळगावातील सरकारी कार्यालये, आस्थापने, बसेस आदी ठिकाणी कन्नड, इंग्लिशसोबतच मराठी भाषेतही नामफलक लावण्याची मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली. १५ दिवसांत ही मागणी पूर्ण न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
याआधी बेळगावात कन्नड, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेतील नामफलक आढळून येत होते. मात्र त्यावर सरकारची वक्रदृष्टी पडली. सरकारी नामफलकातून मराठी भाषेला वगळण्याचा कुटील डाव खेळण्यात येत आहे. स्मार्टसिटीच्या कामांमध्येही हेच दिसून येत आहे. स्मार्टसिटी योजनेत केवळ कन्नड आणि इंग्लिश भाषेतील फलक उभारण्यात येत असल्याची मराठी भाषिकांची तक्रार आहे. त्यामुळे त्रिभाषा सूत्रानुसार कन्नड, इंग्लिशसोबत मराठी भाषेतील फलकही लावण्याच्या मागणीचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाचे निवेदन शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी निवेदन स्वीकारून या संदर्भात येत्या २०-२१ तारखेला बैठक घेऊन सरकारला अहवाल, निवेदन पाठवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले की, ज्या भागात १५% हून अधिक भाषेचे लोक असतील त्यांना त्यांच्या मातृभाषेतून सरकारी परिपत्रके द्यावीत, त्यांच्या मातृभाषेतील नामफलक लावावेत असा केंद्र सरकारचाच नियम आहे. २००३मधील एका सरकारी आदेशानुसार अथणी, बेळगाव, चिक्कोडी आणि खानापूर या तालुक्यात मराठी भाषिकांची संख्या १५% हून अधिक आहे. बेळगाव सीमाभागात कन्नड, मराठी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांतील नामफलक होते. पण आता स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांकडून ते हटवून केवळ कन्नड व इंग्लिश भाषेतील फलकच लावण्यात येत आहेत. त्यामुळे या दोन्ही भाषा न येणाऱ्या मराठी भाषिकांची गैरसोय होत आहे. सरकारी कार्यालये, आस्थापने, बसेस आदी ठिकाणी कन्नड, इंग्लिशसोबतच मराठी भाषेतही नामफलक लावले पाहिजेत. याबाबत स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांनाही सूचना द्याव्यात, १५ दिवसांत याची कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. या प्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, बी. डी. मोहनगेकर यांच्यासह म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.