बेळगाव : महाराष्ट्राचे मंत्री 3 डिसेंबरला बेळगावात आल्यास तदनंतर उद्भवणाऱ्या आपत्तीला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी दिला आहे.
या संदर्भात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या, नारायण गौडा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांना कोणत्याही कारणास्तव बेळगावला येऊ देऊ नये, अशी विनंती केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक गुडगनट्टी म्हणाले, महाराष्ट्राचे मंत्री आल्याने इथले भाषिक वातावरण बिघडू शकते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणत्याही कारणास्तव बेळगावात येऊ देऊ नये. ते येथे येऊन प्रक्षोभक भाषणे करून भाषिक सलोखा धोक्यात आणून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करू शकतात.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात येऊ दिल्यास खपवून घेतले जाणार नाही. ते आले तर आम्ही त्यांना धडा शिकवू. त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करू. अशा वेळी कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम झाल्यास जिल्हा प्रशासन व राज्य शासन जबाबदार असेल. त्यांना कर्नाटक सीमेत प्रवेश देऊ नये, अशी मागणी दीपक गुडगनट्टी यांनी केली.
यावेळी करवे राज्य समन्वयक महादेव तळवार म्हणाले की, येथील राजकारण्यांनी व्होट बँकेच्या पार्श्वभूमीवर मौन बाळगले आहे. पण मध्य कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकातील लोक का बोलत नाहीत. कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रात भाजपाची सत्ता आहे. दुहेरी इंजिन नसून तिहेरी इंजिन आहे. मग राज्यातील खासदार केंद्रावर दबाव का आणत नाहीत आणि महाजन अहवाल अंतिम असल्याचे सांगत आहेत. राज्यातील राजकारण्यांची इच्छाशक्ती नाही. महाराष्ट्राच्या राजकारण्यांकडून त्यांनी शिकले पाहिजे असे ते म्हणाले.
एकूणच महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्यास करवेकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. मंगळवारी खुद्द एडीजीपी अलोककुमार यांनी महाराष्ट्राचे मंत्री जर वैयक्तिक कारणासाठी येत असतील तर आम्ही त्यांना अडवू शकत नाही, मात्र त्यांचा हेतू वेगळा असेल तर आम्ही कायदेशीर कारवाई करू असे माध्यमांसमोर स्पष्ट सांगितले असतानादेखील आज करवेने पोलीस आयुक्तांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta