बेळगाव : दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून दर रविवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह एखाद्या भागात जाऊन त्या भागाचे स्वच्छतेचे काम करतात. रविवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर परिसरात भेट देऊन स्वच्छता मोहीम राबविली.
त्याचे असे झाले! मंदिराच्या परिसरात बराच कचरा पडलेला होता व गवत आणि झुडपे वाढली होती त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. महानगरपालिकेतर्फे ती झुडपे काढून परिसर स्वच्छ केला जावा अशी विनंती मंदिराचे ट्रस्टी अनंत लाड यांनी वॉर्ड नंबर 41 चे नगरसेवक मंगेश पवार यांना केली होती. लागलीच मंगेश पवार यांनी वॉर्ड नंबर 29 चे नगरसेवक नितीन जाधव आणि आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत रविवारी सकाळी या भागात येऊन झुडपे तर काढलीच शिवाय संपूर्ण कचरा, पडलेले फोटो, फरशांचे तुकडे असे सर्व काही साफ केले. दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून या स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. त्यानंतर मंदिराशेजारी असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची आमदारांनी पाहणी केली आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे पाणी पुरवठा केला जावा अशा सूचना केल्या.
दर रविवारी सकाळी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत दोन तास खर्च करून परिसर स्वच्छतेची मोहीम आम्ही नियमितपणे हाती घेत आहोत त्याला नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळेस अभय पाटील यांनी केले. त्यांच्या या कार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आणि स्वच्छता राखण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले
![](https://belgaumvarta.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211010-WA0170-660x330.jpg)