ग्रामस्थांचे खासदारांना साकडे
उचगाव : उचगावमधील लक्ष्मी गल्ली आणि गणपत गल्लीत सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता व गटार निर्माण काम अशास्त्रीय पद्धतीने करण्यात येत आहे. ते शास्त्रीय पद्धतीने, लोकांना अनुकूल होईल अशारीतीने करण्याची मागणी ग्रामस्थांतर्फे खा. मंगल अंगडी यांच्याकडे करण्यात आली आहे.
उचगावमधील लक्ष्मी गल्ली आणि गणपत गल्लीतील रहिवाशांनी बुधवारी खा. मंगल अंगडी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. रस्ते आणि गटारीचे काम शास्त्रीय पद्धतीने तसेच रहिवाशांना सोयीस्कर व्हावे अशा पद्धतीने करावे. त्याबाबत बांधकाम खात्याचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराला सूचना द्यावी अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी यावेळी खा. अंगडी यांना दिले. ते स्वीकारून याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन खा. मंगल अंगडी यांनी ग्रामस्थांना दिले. यावेळी माजी मंडळ पंचायत सदस्य अरुण जाधव, माजी सरपंच संभाजी कदम, ग्राम पंचायत सदस्य व माजी चेअरमन योगिता देसाई, माजी लॅण्ड ट्रिब्युनल मेंबर बाळासाहेब देसाई व चंद्रकांत देसाई, रामचंद्र डोणकरी आदी उपस्थित होते.
