मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत आवाहन
बेळगाव : हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा तसेच सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून प्रयत्न करावेत. सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात “चलो मुंबई” आंदोलन छेडण्याचा विचार मध्यवर्तीच्या बैठकीत करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर हे होते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज 13 जानेवारी रोजी मराठा मंदिर येथे पार पडली. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. घटक समितीनी आपापल्या भागात हुतात्मा दिनी हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे आवाहन मध्यवर्तीने केले आहे तर बेळगाव शहरात हुतात्मा चौक येथे हुतात्मा दिन पाळण्यात येणार आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सतर्क राहण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी “चलो मुंबई” आंदोलन छेडून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सीमाप्रश्नी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न करण्यात यावे, अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे. तसेच “चलो कोल्हापूर”आंदोलनावेळी महाराष्ट्र बंदची हाक देण्याची विनंती मध्यवर्तीने केली होती. मात्र याबद्दल महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी कोणतीच हालचाल केली नाही याबद्दल बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे चिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी नगरसेवक रणजित पाटील, एस. एल. चौगुले, रावजी पाटील, विकास कलघटगी, खानापूर अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सेक्रेटरी सीताराम बेडरे, बी. डी. मोहनगेकर, जयराम मिरजकर आदी उपस्थित होते.