बेळगाव : 1956 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड आदी भागातून रॅली काढण्यात येणार आहे.
भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगांवसह सीमाभागातील 865 मराठी भाषिक गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात अली. त्यानंतर 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या आंदोलनात मधू बांदेकर, कमलाबाई मोहिते, लक्ष्मण गावडे, मारुती बेन्नाळकर, महादेव बारागडी यांनी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात बलिदान दिले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी हुतात्मा दिन पाळण्यात येतो. यावर्षी देखील सीमावासीयांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
बेळगाव तालुका समितीतर्फे कंग्राळी येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे तर खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे खानापूर स्टेशन रोड येथे सकाळी ठीक 9.30 वाजता हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे, सचिव सीताराम बेडरे यांनी केले आहे.