बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतचे पिडिओ अरुण नाईक यांच्यासंदर्भात जिल्हा पंचायत सीईओ, तालुका पंचायत इओ व इडी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये येळ्ळूर ग्राम पंचायत विकास अधिकारी अरुण नाईक यांच्याबद्दल वेळेवर कार्यालयाला न येणे, अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्यांना मान सन्मान न देणे, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कामे करणे अशा तक्रारी असून पंचायत ठराव नसतानाही ते कामे करत आहेत त्यामुळे पंचायतीच्या करामध्ये फार मोठी कमतरता होत आहे. ग्राम पंचायतीमध्ये विकास कामाऐवजी सदस्यामध्ये एकमेकांमध्ये तेड निर्माण करणे, ग्राम पंचायत माध्यमातून जी विकास कामे झाली आहेत त्या कामांची बिले वेळेत न देणे आणि त्यांना त्रास देणे, जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मधून मंजूर झालेल्या कामांची माहिती न देणे, जेंव्हा लोक आपल्या समस्या घेऊन जातात तेंव्हा त्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे, सरकारी आदेशांची अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्यांना व लोकांना आगाऊ महिती योग्य रित्या न देता, रोजगार योजनेची कामे योग्यरित्या न करणे आणि रोजगार योजनेच्या विकास कामांकडे दुर्लक्ष करून रोजगार अंतर्गत झालेल्या कामांची बिले वेळेत न करणे, ई उत्तरा आणि एनओसी व हात उतारा वेळेवर न देणे व त्यांना त्रास करणे, इतकेच नाही तर सरकारी शाळां व अंगणवाडी यांच्या विकास कामांचा आराखडा 1,15,20,000/- जिल्हा पंचायत व तालुका पंचायती कडून मंजूर होऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करून अध्यक्ष व सदस्यांना याची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे गावातील शाळा व अंगणवाडी यांचा विकास झाला नाही. यामुळे गावात त्यांच्याबद्दल फार मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
तसेच कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर देत नसत, पगार देण्यासाठी त्यांची नेहमीच टाळा टाळ असायची आणि गेल्या 6 जानेवारी पासून 16 जानेवारीपर्यंत रजा न घालता ते ग्राम पंचायतीला स्वतः तर हजर झाले नाहीत शिवाय दुसऱ्या पिडिओ ना सुद्धा त्यांचे अधिकार त्यांनी दिले नाहीत. त्यामुळे गावातील बरीच कामे रखडलेली आहेत.
वरील सर्व कामात येळ्ळूर ग्राम पंचायतचे विकास अधिकारी अरुण नाईक यांनी केलेल्या चुकांमुळे गावाचा विकास रखडलेला आहे तसेच यांच्या कामाबाबत जनतेतून तक्रारी येत आहेत. गेली 2 वर्षे त्यांच्या कामकाजा संदर्भात सदस्य व ग्रामस्थाकडून तक्रारी येत असल्याने पिडिओ अरुण नाईक यांची बदली करावी म्हणून मागील 1 वर्षांपूर्वी मासिक बैठकीमध्ये 10/01/2022 रोजी त्याची बदली करावी असा असा ठराव पास झाला होता. तरी अध्यक्ष व सदस्यांनी त्यांना एक संधी दिली होती. मात्र त्यांच्या कामामध्ये कोणताही बदल नसल्यामुळे त्यांची तत्काळ अन्यठिकानी बदली करावी आणि त्यांच्या जागी दुसऱ्या पंचायत विकास अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी विनंती करण्यात आली आहे.तसेच याची दखल घेऊन लवकरात लवकर त्यांची बदली न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा पाटील, उपाध्यक्ष, लक्ष्मी मासेकर, सदस्य शिवाजी नांदूरकर, प्रमोद पाटील, परशराम परीट, रमेश मेनसे, जोतिबा चौगुले, राकेश परीट, दयानंद उघाडे, सदस्या अनुसया परीट, पार्वती राजपूत, मानिशा घाडी, रूपा पुण्यनावर, सुवर्णा बीजगरकर, शालन पाटील, वनिता परीट, सोनाली येळ्ळूरकर उपस्थित होते.