बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले. यानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली वाहून गावात फेरी काढण्यात आली.
बेळगावसह सीमाभाग हा तत्कालीन म्हैसूर प्रांताला जोडण्यात आल्यानंतर बेळगावात त्या विरोधात पहिले मोठे आंदोलन झाले. या आंदोलनावेळी 17 जानेवारी 1956 रोजी चार आणि दुसऱ्या दिवशी एक अशा पाच जणांना पोलिसांच्या गोळीबारात बळी पडावे लागले. सीमालढ्यात बलिदान दिलेल्या त्या व अन्य अशा सर्व हुतात्म्यांना कंग्राळी खुर्द येथे अभिवादन करण्यात आले.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कंग्राळी खुर्द येथील सीमालढ्यात हुतात्मा झालेल्या मारुती बेंन्नाळकर यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रारंभी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मारुती बेन्नाळकर यांच्या प्रतिमेला माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले.
यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में, नाही नाही कधीच नाही, कर्नाटकात राहणार नाही अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर गावातून घोषणा देत फेरी काढण्यात आली.
याप्रसंगी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, आर. एम. चौगुले, कृष्णा हुंदरे, ऍड. सुधीर चव्हाण, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, सचिन गोरले, भाऊ पाटील, मनोज पावशे, कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, राकेश धामणेकर, निंगाप्पा जाधव, माजी नगरसेविका निलीमा पावशे, पौर्णिमा पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटिल, अर्चना हलगुंडी, ज्योती पाटिल, रुक्मिणी निलजकर, प्रसाद पाटील, रामचंद्र मोदगेकर, मदन बामणे, एन. आर. कालकुंद्री, एम. जी. पाटील, लक्ष्मण होनगेकर, आर. आय. पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.