भाजप किसान मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची सांगता
बेळगाव : भारतीय जनता पक्ष देशातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध योजना जाहीर करून त्या प्रत्यक्षात अंमलात आणत आहेत. या योजनांचा देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय संघटन प्रधान कार्यदर्शी संतोषजी यांनी केले.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक बेळगावात पार पडली. बैठकीच्या समारोप समारंभात बोलताना संतोषजी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन यावेळी केले. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रचार अभियान राबवण्यासह किसान मोर्चा व कार्यकर्त्यांचे दायित्व काय? याबाबत मार्गदर्शन केले.
दोन दिवशीय किसान मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीची सोमवारी सांगता झाली. या कार्यकारणी बैठकीत देशभरातील सर्व राज्यातून किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. संतोषजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तीन सूत्रांचा अवलंब करण्याचा कानमंत्र दिला. यामध्ये ग्राम, पारंपारिक सेंद्रिय शेती तसेच शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यास सांगितले. यावेळी विविध राज्यातील शेतकरी प्रतिनिधींनी संतोषजी यांच्या समोर आपल्या समस्या मांडल्या तसेच विविध मागण्यांबाबत वरिष्ठांना कळविण्यास सांगितले.
भाजप किसान मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार चहर यांनी किसान मोर्चाच्या वतीने आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान किसान सन्मान योजनेस यंदा चार वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त येत्या 24 फेब्रुवारी रोजी देशभरातील सर्व जिल्हास्तरावर विशाल किसान संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती चेहर यांनी यावेळी दिली. संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असणारे पारंपरिक शेती अभियान निरंतरपणे राबवणार असून केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागातही किसान मोर्चाची संघटना करावी, अशी सूचना राजकुमार चेहर यांनी यावेळी केली.
राज्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील बोलताना राज्य सरकार वतीने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. पुढील दिवसात रयत शक्ती योजनेअंतर्गत सबसिडी दराने डिझेल विक्री करण्यात येणार असल्याचे सांगितले. ही योजना राबवणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी यावेळी सांगितले .
व्यासपीठावर राज्यसभा सदस्य आणि कर्नाटक भाजप रयत मोर्चाचे राज्याध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कर्नाटक किसान मोर्चाचे प्रभारी आणि भाजपचे प्रधान कार्यदर्शी एन. रविकुमार यांच्यासह आमदार अनिल बेनके, राज्य प्रवक्ते एम. बी. जिरली, माजी आमदार संजय पाटील, जगदीश मेटगुड, बेळगाव विभाग संघटनासह प्रभारी जयप्रकाश, महानगर प्रधान कार्यदर्शी मृगेंद्रगौडा पाटील, दादा गौडा बिरादार आदींसह माध्यम प्रमुख शरद पाटील अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta