बेळगाव : राजकीय दबावाखाली श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना रावडीशीटर ठरवून मराठी युवकांना तडीपार केले जात असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे.
शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली जाणूनबुजून रावडीशीटर ठरवून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. श्रीराम सेनाच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते समाजसेवा करत असतात मात्र या तरुणांवर अवैध धंदे करत असल्याचा आरोप करून खोटे गुन्हे नोंदविले जात आहेत. अफू, गांजासारख्या अमली पदार्थांची खुलेआम विक्री करणाऱ्यांना राजकीय वरदहस्त मिळत आहे पण श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जातो असे सांगत असताना अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांची नावे देखील रमाकांत कोंडुस्कर यांनी सांगितले आहेत. त्याचप्रमाणे श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या कार्यक्रमास जाणूनबुजून परवानगी नाकारली जाते, त्या उलट दक्षिण मतदार संघाच्या आमदारांच्या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी जातीने हजर राहतात असा आरोप देखील यावेळी करण्यात आला. श्रीराम सेना हिंदुस्थान एखाद्या कार्यक्रमासाठी परवानगी मागण्यासाठी गेली तर त्यांना परवानगीसाठी संबंधित कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात. सर्व कायदेशीर अटी पूर्ण करून देखील या- ना त्या कारणाने त्यांना परवानगी नाकारली जाते. प्रशासन असा दुजाभाव का करते असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
पोलीस प्रशासन राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली काम करत आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली सामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही झाली पाहिजे त्यासाठी जिल्हा पोलीस आयुक्तांना आपण निवेदन देणार आहे असेही त्यांनी सांगितले.
28 जानेवारी रोजी घडलेल्या गांजा जप्ती प्रकरणी टिळकवाडी पोलीस अधिकाऱ्यांनी साटेलोटे करून सोडून दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यासाठी आरपीडी कॉलेज परिसर व टिळकवाडी पोलीस स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासा म्हणजे सत्य कळेल असे ते म्हणाले. जनतेने देखील अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा देणाऱ्या राजकारण्यांना येत्या निवडणुकीत धडा शिकविला पाहिजे, असे देखील ते म्हणाले.
आमच्या संघटनेने हिंदुत्ववादी आहे. सामाजिक कार्य करीत आहेत. कोरोनाच्या काळात कार्यकर्त्यांनी खूप काम केले आहे.
यावेळी पत्रकारांनी रवी कोकितकर गोळीबार प्रकरणी प्रमोद मुतालिक यांनी केलेल्या आरोपाचे रमाकांत कोंडुसकर यांनी खंडन केले. हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta