बेळगाव : श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पोलीस प्रशासन दडपशाही करीत असल्याचा घणाघाती आरोप श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे.
कट्टर हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नाहक त्रास देण्यात येत असून अफू, गांजा सारख्या अमली पदार्थांच्या तस्करीत मुद्देमालासाहित सापडलेल्या गुन्हेगारांना मात्र सोडून देण्यात येत आहे. टिळकवाडी पोलिसांकरवी अर्थपूर्ण व्यवहार करून या गुन्हेगारांना सोडण्यात येत असल्याचा आरोप देखील रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कोंडुस्कर म्हणाले की, 28 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास टिळकवाडी पोलिसांनी अफू, गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासाहित पकडले होते. टिळकवाडी पोलिस निरीक्षक व सहकाऱ्यांनी दोन आरोपींना अटक करून जप्त केलेल्या अमली पदार्थांचे फोटो देखील काढले परंतु त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता गुन्हेगारांना मोकाट सोडून देण्यात आले आहे. सदर आरोपींचे अटक करतानाचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहेत. आरोपींना मोकाट सोडून देण्यामागचे गौडबंगाल काय? या आरोपींना कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
टिळकवाडी पोलीस स्थानकातील पोलीस अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात यावी. त्यांच्या बँक खात्याची देखील चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रीरामसेना हिंदुस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे.
यावेळी वकील मंडळींसह उमेश कुऱ्याळकर भरत पाटील, नंदू इंदलकर, नारू निलजकर, सुहास चौगुले, राजेंद्र बैलूर, राहुल अवणे, सावंत, महेश मजूकर आदींसह श्रीराम सेना हिंदुस्तानचे बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.