बेळगाव : स्मार्ट सिटीच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी उघडकीस आणला आहे. त्यांच्याशी जनतेने संपर्क साधून याबाबत माहिती दिल्याने रमाकांत कोंडुस्कर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. महिन्या आधी डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे परत एकदा काँक्रिटीकरण सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली अशा हलक्या दर्जाचे काम करून कसे चालेल असे त्यांनी म्हटले.
सामान्य जनतेच्या टॅक्समधून हा निधी उपलब्ध केलेला असून देखील असे हलक्या दर्जाचे काम केलेले आहे. काही भागांमधून अजून गटारी देखील केलेल्या नाहीत. तसेच वडगाव-अनगोळ रस्ता सहा महिने झाले खणून ठेवलेला असून देखील तो करण्यात आलेला नाही. उद्यमबागला जाणाऱ्या कामगार वर्गाला वडगाव अनगोळ रोड खूप सोईस्कर आहे. त्या रस्त्याचे काम रखडल्याने कामगार वर्गाला खूप गैरसोय होत आहे, असेही त्यांनी म्हटले. जनतेच्या माध्यमातून त्यांना असे समजले की आता निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाच्या लोकांचेच काम करून देतात. लोकप्रतिनिधीकडे रस्त्याचे किंवा इतर कोणतेही काम सांगण्यास गेले तर ते सरळ सांगतात की तुम्ही आम्हाला तुमचे मत दिलेले नाही तुमचे काम आम्ही करून देणार नाही, व आमच्या पक्षाचा झेंडा तुमच्या घरावर लावलेला नाही. त्यामुळे तुमचे कोणतेही काम आम्ही करून देणार नाही. यापुढे तुमचे कोणतेही काम करून हवे असल्यास आम्हालाच मत द्या. आमच्या पक्षाचा झेंडा तुमच्या घरावर असला पाहिजे असे ठामपणे सांगतात व मला तुम्ही मत दिला नाही किंवा माझ्यासोबत आला नाही तर हे केलेले रस्ते व गटारी जेसीबी आणून उखडून टाकू व खराब करू असेही लोकप्रतिनिधी म्हणतात हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे रमाकांत कोंडुस्कर यांनी म्हटले आहे.
लोकप्रतिनिधी हा कोणत्याही पक्षाचा नसून तो संपूर्णतः समाजाचा असतो व त्याने समाजाचे काम केले पाहिजे. कोणीही आमदार असो किंवा खासदार असो तो आपल्या खिशातून हा पैसा घालून रस्त्याचे काम करत नाही. हा जनतेचा पैसा आहे व त्याचा उपयोग चांगल्यारितीने होत नसेल तर मी जनतेच्या माध्यमातून जाब विचारणार आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta