बेळगाव : सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा रद्द झाल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की, ही चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. अनेक नेते राजकीय स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात हळदीकुंकूचा कार्यक्रम करून महिला आमच्या पक्षात आल्या आहेत हे सांगतात. चित्रकला स्पर्धा अचानकपणे रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळजवळ 1 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी आपली नावे नोंदवली होती. स्पर्धेसाठी लागणारे सर्व साहित्य विमल फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले होते. गटशिक्षणाधिकाऱ्यांना व शाळांना पूर्व सूचना देऊन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तरी शिक्षण अधिकाऱ्यांनी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन ही स्पर्धा ऐन वेळेस रद्द केल्याने विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. चित्रकला स्पर्धा रद्द करण्यामागे कोणाचा हात आहे याची चौकशी व्हावी, असेही रमाकांत कोंडुसकर म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta