बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी विविध प्रकारचे विकासकामे सुरू आहेत.विकास कामांना चालना मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असतानाच काही ठिकाणी अर्धवट राहिलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना नव्या त्रासाला तोंड देण्याची वेळ आली आहे. असा प्रकार राम कॉलनी आदर्श नगर परिसरातील गटार बांधणी कामात पाहायला मिळत आहे. आदर्शनगर राम कॉलनी परिसरात ड्रेनेज, गटार, रस्ते आदी कामे अधिक कामे हाती घेण्यात आले आहेत.
आम.अभय पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हिंदवाडी भाग्यनगर आदर्श नगर राम कॉलनी या भागात विविध विकासाच्या कामांना चालना दिली आहे. अनेक ठिकाणी गटार,रस्त्याची कामे झाली आहेत. त्याचबरोबर बर्याच परिसरातून पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नव्याने गटार आणि ड्रेनेजचे कामही हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत आदर्श नगर राम कॉलनी परिसरात गटार बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र सदर काम अर्धवटच राहिले आहे. एका ठिकाणी अर्धवट स्थितीत राहिलेल्या गटार कामामुळे पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.रात्रंदिवस डासांच्या वाढत्या प्रभावामुळे नागरिक हैराण झाले आहेत.वाढत्या डासांमुळे नागरिकांना आरोग्याची चिंता लागली आहे. याची दखल घेऊन संबंधित विभागाचे नगरसेवक मंगेश पवार यांनी लवकरात लवकर सदर गटारीचे काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.