Saturday , June 15 2024
Breaking News

पडद्याआड समाजसेवकांच्या सत्काराबाबत सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशन आवाहन

Spread the love

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाचा प्रतिकूल काळात गरजू लोकांच्या मदतीला धावून जाऊन त्यांना दिलासा मिळवून देणार्‍या मात्र अद्याप प्रसिद्धीपासून दूर पडद्याआड असलेल्या सेवाभावी निस्वार्थ कार्यकर्त्यांचा शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याद्वारे त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. तसेच यासाठी जनतेने आपल्या भागातील संबंधित व्यक्तीच्या नांवाची शिफारस करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणताही जाती -धर्म, भाषा भेद न करता सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्‍या शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे पुरस्कर्ते आणि स्वयंसेवकांच्या मदतीने गेल्या 2017 सालापासून हेल्प फॉर नीडी, फुड फॉर नीडी व एज्युकेशन फॉर नीडी या संघटनांच्या माध्यमातून कोणताही जाती -धर्म, भाषा भेद न करता सामाजिक हित साधण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. त्याचबरोबर मोफत वैद्यकीय सेवाही दिली जात आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात निरपेक्ष वृत्तीने अनेक कार्यकर्त्यांनी समाजातील गरीब गरजू आणि असहाय्य लोकांची विविध स्वरूपात मदत केली आहे. अशा या कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल अद्याप कोणीही घेतलेली नाही, ती घेतली जावी. प्रसिद्धीपासून दूर राहून पडद्याआड काम करणार्‍या या समाजसेवकांना प्रोत्साहित केले जावे, या उद्देशाने अनगोळकर फाऊंडेशनने संबंधितांना जगापुढे आणून खास स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आमच्या संस्थेप्रमाणे शहरातील बर्‍याच सेवाभावी संघ -संस्थांनी कोरोना प्रादुर्भाव काळात आपल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याद्वारे चांगला नांवलौकिक मिळवला आहे.
मात्र या संघ -संस्थांच्या बरोबरीनेच शहरातील गल्लीबोळातील अनेक कार्यकर्ते कोरोना काळात सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेले आहेत. गरजूंना वैद्यकीय सेवा मिळवून देणे, रुग्णांना हॉस्पिटलला ने-आण करण्यासाठी मदत करणे, रुग्णांची सेवा शुश्रूषा, हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी धडपड करणे वगैरे अनेक लहान मोठी परंतु महत्त्वाची कामे या पडद्याआड असणार्‍या कार्यकर्त्यांनी सतत अहोरात्र केली आहेत. आमच्या प्रमाणे या समाजसेवकांच्या कार्याची दखल त्यांच्या-त्यांच्या भागातील जनतेकडून घेतली जाऊन त्यांचा गेल्या गणेशोत्सव काळात सन्मान केला जाईल, अशी माझी अपेक्षा होती.
परंतु दुर्दैवाने तसे न घडल्यामुळे मी माझ्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनतर्फे संबंधित पडद्याआड असणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती सत्काराच्या उपरोक्त उपक्रमासंदर्भात बोलताना अनगोळकर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी दिली.
त्याप्रमाणे कोरोना प्रादुर्भाव काळात निस्वार्थ भावनेने ज्याने अडचणीत सापडलेल्या गरजू लोकांची सर्वाधिक मदत करून दिलासा दिला आहे अशा आपापल्या भागातील कार्यकर्त्याचे नांव सुचविण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी जनतेने 9880089798 या मो. क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही अनगोळकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

भुतरामहट्टीजवळ टिप्पर – बसचा अपघात; कोल्हापूरचे 40 विद्यार्थी जखमी

Spread the love  बेळगाव : भुतरामहट्टीजवळ टिप्पर आणि कॉलेज बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 40 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *