बेळगाव : बालरंगभूमीला अनेक अडचणींना तोंड देत काम करावे लागत आहे. मुठभर मंडळी बालरंग भूमीसाठी चिकाटीने काम करत आहेत. अशावेळी बालरंगभूमीबद्दलच्या कल्पना सुधारणे आवश्यक आहे. परदेशात मुलांच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. याचा विचार केल्यास, बालरंगभूमीकडे आपण उघड्या डोळ्यांनी केव्हा पाहणार? असा सवाल अभिनेत्री, नाट्यनिर्देशिका, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि पहिल्या बाल नाट्य संमेलन अध्यक्षा मीना नाईक यांनी आज बोलताना केला.
येथील संत मीरा हायस्कूलमध्ये बाल रंगभूमी अभियान मुंबईतर्फे आणि अखिल भारतीय नाट्य परिषद बेळगाव शाखा तसेच फुलोरा संस्थेच्या सहकार्याने पहिल्या बालनाट्य संमेलनाचे आज उत्साहात उद्घाटन झाले. अभिनेत्री सई लोकूर यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मीना नाईक, सई लोकूर यांच्यासह अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पदाधिकारी व फुलोरा संस्थेच्या संस्थापिका विना लोकूर, बालरंगभूमी अभियानाचे देवदत्त पाठक, डॉक्टर राजेंद्र चव्हाण आणि संध्या देशपांडे उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना मीना नाईक यांनी बालनाट्य आणि रंगभूमी विषयी आपले अनुभव सांगितले. बालकांचे, बालकांसाठी, बालकांनी सादर केलेले नाटक म्हणजे बालनाट्य अथवा बालरंगभूमी म्हणणे योग्य नाही. बालनाट्य बद्दलच्या कल्पना आपणाला सुधारायला हव्यात.
जागतिकीकरणाच्या काळात बालकांचे विषय बदलले आहेत. बालकांना आवडणाऱ्या विषयांवर आधारित बालनाट्यांची निर्मिती आवश्यक आहे. पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर यांनी चांगली बालनाट्ये लिहिली. शालेय रंगभूमी मुलांच्या जीवनात आनंद देण्याचा, त्यांना व्यक्त होण्याचे प्रभावी माध्यम आहे. बालनाट्यातून छोट्या मुलांवर चांगले संस्कार घडतात. मात्र तरीही बाल रंगभूमी विषयी नाक मुरडणारे अस्तित्वात आहेत. अडचणीच्या काळातही मुठभर मंडळी बाल रंगभूमीसाठी चिकाटीने काम करत आहेत. त्यांना सरकारी आश्रय मिळणे आवश्यक आहे. बालरंगभूमी, बालनाट्ये बालनाट्यांच्या कार्यशाळा आणि तालमी घेण्यासाठी छोटे हॉल आणि प्रशस्त थिएटर आवश्यक आहेत. बालनाट्यांच्या जाहिरातींना सवलत हवी.
व्यावसायिक नाट्यमंडळींनी बाल रंगभूमी चळवळीला हातभार लावावा.सांस्कृतिक खात्याने व्यावसायिक नाट्य कंपन्यांना वर्षातून एक तरी बालनाट्य करण्याची अट घालावी, असेही मीना नाईक यांनी स्पष्ट केले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना अभिनेत्री सई लोकूर म्हणाल्या, तिसरीत असताना नाटकात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यातूनच अभिनय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. फुलोरा संस्थेमधून अभिनयाचा प्रवास सुरू झाला. आईचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. अभिनयाच्या वाटचालीत अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात केली. रंगभूमीमुळे अभिनयाचा आत्मविश्वास मिळाला. रंगभूमीवर मिळालेल्या आत्मविश्वासातून कॅमेरासमोर आत्मविश्वासाने वावरता आले. याचा विचार केल्यास कोणत्याही क्षेत्रात काम करताना आत्मविश्वास आवश्यक असल्याचे मत सई लोकूर यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनीही कवितेच्या माध्यमातून छोट्या मुलांमध्ये उत्साहाचा रंग भरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. विणा लोकूर यांनी प्रास्ताविक भाषण केले. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी बालनाट्य कलाकार आणि रसिकांनी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
Belgaum Varta Belgaum Varta