Wednesday , December 10 2025
Breaking News

श्रेयवादाच्या लढाईत शिवरायांच्या विचारांना तिलांजली?

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करून उद्घाटन व लोकार्पण सोहळा असा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमा वेळी उद्घाटन समारंभाला एक पक्षाचे लोक व लोकार्पण समारंभाला दुसऱ्या पक्षाचे लोक हे दृश्य आपल्याला समोर दिसून आलं, उद्घाटन समारंभाला कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित होते तर दुसऱ्या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, छत्रपती शिवरायांचे कोल्हापूरचे वंशज छत्रपती संभाजी राजे, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, व काँग्रेसचे लातूरचे आमदार धीरज देशमुख हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हे दोन कार्यक्रम झाले परंतु बेळगावची जी सीमाप्रश्नांची लढाई आहे, या संघर्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठी नेत्यांच्या विरुद्ध आपली खदखद व्यक्त करताना दिसून आला.
छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असून जाती, धर्माच्या, भाषेच्या पलीकडे जाऊन एक आदर्श घेण्यासारखे राजे आहेत. त्यामुळे ते सर्वांचेच राजे आहेत. राजहंसगडावर त्यांची मूर्ती स्थापन होणे व या गडाचा देखील विकास होणे हे समाधानकारक आहे. परंतु ज्या भावनेने हा उद्घाटन व लोकार्पण समारंभ झाला त्यातूनच शिवरायांना केंद्रबिंदू न करता आपल्या पक्षाची ध्येयधोरणे लोकांच्या समोर बिंबविण्याचा प्रयत्न दिसून आला व आम्ही किती शिवरायाचे पाईक आहोत व मराठा समाजाचे उद्दारक आहोत हे प्रकर्षाने दिसून येत होते. छत्रपती शिवरायांचे कार्य हे अन्याय, अत्याचाराच्या विरोधात जाऊन सर्व समाजातील बारा बलुतेदारांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले होते. राजांचा आदर्श साडेतीनशे वर्षानंतरही अनेकांना प्रेरणा देत आहे. आजही त्यांचा अभ्यास अनेक जण करत आहेत, असे थोर राजे होऊन गेले. राजहंसगड हा बेळगाव शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर आहे. 2005 साली हा गड सांगलीच्या पटवर्धन सरकारकडून विक्रीस काढण्यात आला होता. ही बातमी त्यावेळस एका वृत्तपत्रातून जाहीर होताच, उचगावचे लोकप्रिय तात्कालीन आमदार मनोहर किणेकर यांनी विधानसभेत आवाज उठवून हा किल्ला पुरातन विभागाकडे विलीन करण्यात आला होता. या किल्ल्याचा विकास करण्यासाठी त्यांनी आपल्यापरिने प्रयत्न चालू केले होते, परंतु २००८ मध्ये मध्यावधी निवडणुका लागल्यामुळे त्यांना या किल्ल्याचा विकास करता आला नाही. परंतु दुर्दैवाने त्यानंतरच्या लोकप्रतिनिधींनी म्हणावा तितका या गडाकडे विकास करण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे ठेवला नाही व प्रयत्नही केला नाही. विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्यापरिने या गडाचा विकास केला. या गडावर 55 फुटी शिवमूर्ती स्थापन केली परंतु ही शिवमूर्ती स्थापन केल्यानंतर या मूर्तीचे उद्घाटन करतेवेळी मुख्यतः काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये श्रेय वादाची लढाई गेले अनेक दिवस दिसून येत होती, या दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते या गडावर येऊन आम्हीच या गडाचे तारणहार आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु हे सारं होत असतानाच 2 मार्च रोजी राज्याचे बसवराज बोम्माई यांच्या हस्ते या गडावरील मूर्तीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक आमदारांना अध्यक्षपद देण्यात आले होते. पण त्यांनी या कार्यक्रमाकडे जाणूनबुजून पाठ फिरवली अशी नागरिकांतून चर्चा चर्चिली जात होती. परंतु उद्घाटन समारंभाला बेळगाव परिसरातील आमदार अनिल बेनके, आमदार रमेश जारकिहोळी, आमदार अभय पाटील हे उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवार दिनांक 5 रोजी पुन्हा शिवमूर्तीचा लोकार्पण समारंभ आयोजित करून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले, कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील आणि लातूरचे आमदार धीरज देशमुख हे उपस्थित होते. या साऱ्यांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात या शिवमुर्तीचा लोकार्पण समारंभ उत्साहात संपन्न झाला. सीमाभागात हा कार्यक्रम संपन्न होत असताना ज्या भागात गेल्या 66 वर्षापासून सीमाप्रश्नाची लढाई लढली जाते तो सामान्य कार्यकर्ता या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून बसला होता. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा समारंभ या ठिकाणी होत असताना आपली सीमाप्रश्नाची धगधगती आग पोटात घेऊन हा कार्यकर्ता आपल्या गावीच राहिला होता. आपल्या राजाचा लोकार्पण समारंभ होत असताना हृदयातून मानवंदना दिली. परंतु तत्त्वाची लढाई लढत असताना या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता पोहोचू शकला नाही, भले छत्रपती शिवरायांचे वंशज या कार्यक्रमाला उपस्थित होते तरी देखील अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. ज्या शिवरायांनी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात आपलं राज्य केलं त्यांच तत्त्वाची विचारसरणी जोपासणारे हे कार्यकर्ते होते. गेली 66 वर्षे बेळगाव सीमा भागातील सामान्य कार्यकर्ता लोकशाहीच्या मार्गाने आपली लढाई लढत असताना राष्ट्रीय पक्षांच्या पुढे आपले गुडघे कधी टिकले नाहीत, इथल्या मराठी भाषिकांची एकच मागणी आहे की आमच्यावर अन्याय झाला, आमच्या मातृभाषेच्या राज्यात आम्हाला जायचं आहे. गेली 66 वर्ष हे करत असताना केंद्र व राज्य सरकारला याची थोडीही जाग अजून आली नाही. येथील राष्ट्रीय पक्षांना आगामी काळात होणाऱ्या कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष म्हणजे मराठी, मराठा तरुणांना आम्ही किती शिवरायाचे पाईक आहोत हे दाखविण्याचा अट्टाहास या राष्ट्रीय पक्षांनी चालवला आहे. परंतु त्यांचा हा धुर्त डाव येथील जाणकार मराठा व मराठी भाषिक तरुण ओळखून आहेत. या लोकार्पण समारंभाला राजे व महाराष्ट्रातील आमदार यांनी येऊ नये अशी आर्त हाक येतील म. ए. समितीच्या नेत्याकडून करण्यात आली होती परंतु त्यांनी केलेल्या मागणीला महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी कोणत्या तत्त्वाचा स्वीकार केला हे माहित नाही, परंतु ते उपस्थित होते. हा कार्यक्रम व्यवस्थित संपन्न झाला. छत्रपती शिवराय हे सगळ्या जणांचे राजे आहेत यासाठी आमची कोणतीही अडचण नाही, परंतु समारंभात महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने स्वतः तो आमदार असून देखील आपल्या भाषणाच्या शेवटी “जय कर्नाटक” अशा घोषणा देऊन येथील जनतेला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात दिसून येत होता. ही घोषणा दिल्यानंतर येथील मराठी भाषिकांनी या विरोधात आपली नाराजी दर्शवून त्यांच्या वडिलांनी सीमाप्रश्नासाठी केलेल्या कार्याची जाण ठेवून त्यांनीही या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यावे असाच मोलाचा सल्ला त्यांना देण्यात आला. गेल्या अनेक दिवपासून सीमा भागात या लढा संदर्भात अनेक घडामोडी घडत आहेत हे घडत असताना कोल्हापूर येथे धरणे आंदोलन धरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील यांनी सीमा भागातील मराठी भाषिक व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने आपन या लढ्यात अग्रेसर राहण्याचे वचन दिले होते. परंतु त्यांच्या कृतीला केव्हा सुरुवात होणार हे यासाठी सीमा भागातील मराठी भाषिक लक्ष ठेवून आहेत. स्थानिक आमदार यांनी छत्रपती शिवरायांचा लोकार्पण समारंभ केला परंतु या भागातील मराठी भाषिकांना लोकशाहीच्या मार्गाने जे हक्क दिले जातात ते हक्क देण्यापासून ते कानाडोळा करत आहेत, येथील भाषिकांची मागणी एवढीच आहे की आमची सर्व कागदपत्रे मराठी भाषेत पाहिजेत, येथील बसेस व रस्त्यावर, दुकानावर, सार्वजनिक ठिकाणी असलेला मजकूर मराठी भाषेत पाहिजेत. कायद्याने येथील भाषिकांना त्यांच्या भाषेत देण्याचा कोर्टाकडून आदेश आहे. परंतु सरकारने अद्याप याची अंमलबजावणी केली नाही. लोकांना याबाबतचा न्याय अजून देखील मिळवून दिला नाही आहे. बेळगाव तालुक्यात रिंगरोड सारखे प्रस्ताव हलगा मच्छे बायपास सारखे प्रस्ताव, सांडपाणी सारखे प्रस्ताव आणून तालुक्यातील शेतकऱ्यांना देशधडीला लावण्याचे कारस्थान हे सरकार करत आहे. येथील शेतकरी या विरोधात रस्त्यावर पेटून उठला आहे, त्यांच्या समस्याकडे आमदारांचे विशेष लक्ष नाही. छत्रपतींच्या राज्यात त्यांनी आपल्या सेनाना आदेश दिला होता की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा आदेश छत्रपतींनी आपल्या मावळ्यांना दिला होता, त्याच राज्याचा लोकार्पण समारंभ येथील आमदार करत आहेत परंतु त्या राज्याची तत्वे हे आमदार केव्हा अमलात आणतील तो दिवस ज्या दिवशी उघडेल तेव्हाच अशा राज्याच्या लोकार्पण समारंभाचे फलित साध्य होईल . तालुक्यातील शेतकरी देशोधडीला निघाला आहे आणि आमदार मात्र असे लोकार्पण समारंभ करून शेतकऱ्यांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांनी आणि मराठी भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांचे हे डावपेज ओळखले पाहिजेत. जर सरकार आपल्यावर अन्याय करत असेल तर ते मिळविण्यासाठी आपण लढले पाहिजेत. जर सरकार आपल्याला न्याय देत नसेल तर ते घेण्याचा अधिकार स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्याकडे आहे आणि ते घेण्यासाठी शिवरायांचा आदर्श अभ्यासून अमलात आणणे गरजेचे आहे छत्रपतींच्या मुर्त्या स्थापन करून त्यांचा आदर्श कोणीही अंगारू शकत नाही तर त्यांचा आदर्श स्वीकारून जनतेचे रामराज्य केलं तरच अशा महापुरुषांचे विचार सामान्य जनापर्यंत पोहोचू शकतील. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच राज्यकर्त्यांचे दृश्य आता दिसत आहे. तेव्हा येथील स्वाभिमानी मराठी नागरिकांनी आपली मराठी अस्मिता व सीमाप्रश्न सोडविण्यासाठी एकीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहून या राज्यकर्ताना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे तरच आपण शिवरायांचे खरे वारसदार आहोत हे सिद्ध होईल.

एक शिवभक्त

About Belgaum Varta

Check Also

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

Spread the love  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *