बेळगाव : पोलिसांवर हल्ला करणे आणि डिजेचा कर्णकर्कश आवाज करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणांतून चार शिवप्रेमींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विजय मोहिते, गजानन डोंगरे, सतीश घसारी, दुर्गेश घसारी (सर्व रा. टेंगिनकेरा गल्ली) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ देखाव्यावेळी त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. ३० एप्रिल २०१७ रोजी रात्री ८ च्या दरम्यान टेगिंनकेरा गल्ली येथून छ. शिवाजी महाराज जयंती चित्ररथ देखावा मिरवणुकीला प्रारंभ झाला. पांगुळ गल्लीतून अश्वत्थामा मंदिरकडे जात असताना पोलिसांनी डिजेचा आवाज कमी करण्याची विनंती केली, मात्र कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावेळी पोलिसांवर हल्ला देखील करण्यात आला. यामुळे मार्केट पोलीस स्थानकाचे एएसआय मलिक फत्ते यांनी फिर्याद दिली. राजगुरु चौक युवक मंडळ अध्यक्ष विजय मोहिते यांच्यासह इतर तिघांवर भा. दं. वि. ३४१, ३५३, ३७, १०३, १०९ आणि केपी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मार्केट पोलिसांनी या सर्वांवर जेएमएफसी द्वितीय न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. मात्र साक्षीदारातील विसंगतीमुळे या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांच्यावतीने ऍड. प्रताप यादव आणि ऍड. हेमराज बेंचन्नावर यांनी काम पाहिले.
Belgaum Varta Belgaum Varta