बेळगाव : वडगावसह उपनगरातील विहिरीत ड्रेनेजचे पाणी मिसळल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरात सर्वत्र स्मार्टसिटी अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. नवीन रस्ते करणे, डांबरीकरण, सिमेंटिकरण, गॅस पाईपलाईन अशी विविध कामे जोरात सुरू आहेत. त्या अनुषंगाने सर्वत्र रस्त्याचे खोदकाम चालू आहे. अश्यावेळी अनेक ठिकाणी ड्रेनेज पाईपच्या गळतीमुळे वडगाव परिसरातील कारभार गल्ली, संभाजी नगर, येळ्ळूर रोड, केशव नगर आदी भागात विहिरींना ड्रेनेजमिश्रित पाणी आले आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येत आहे. नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधींना संपर्क केला असता रस्त्याचे काम बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येते महानगरपालिकेचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे बालिश उत्तर नागरिकांना देण्यात आले. त्यामुळे वॉर्ड क्र. 50 मधील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
एल अँड टी कंपनीच्या निष्क्रियपणामुळे जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. अश्यावेळी जनतेला विहिरीच्या पाण्याचा वापर करून आपली दैनंदिन कामे करावी लागत आहेत. मात्र आता विहिरी दुषीत झाल्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
बऱ्याच ठिकाणी हे ड्रेनेजमिश्रित पाण्यामुळे आबालवृद्धांना सर्दी, पडसे सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित नगरसेवकांनी जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या निवारण करणे अपेक्षित होते. मात्र नगरसेवकांनी रस्ता दुरुस्तीची कामे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे बेजबाबदारपणाचे वक्तव्य केल्यामुळे आता आपण दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न संभाजीनगर, केशवनगर परिसरातील नागरिकांना पडला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta