




बेळगाव : गेल्या दोन निवडणुकीत पराभवाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने आगामी विधानसभा निवडणुकीत योग्य रणनीती ठरवून मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार घेतला आहे.
आतापर्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून निवडणुकीच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल उमेदवार निवडीच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर, बेळगाव ग्रामीण आणि खानापूर मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
बेळगाव दक्षिण विधानसभा मतदार संघाचा उमेदवारीसाठी प्रतिज्ञापत्र आणि विनंतीअर्ज सादर करण्याचा आज शेवटचा दिवस होता. आतापर्यंत ‘दक्षिण’साठी वल्लभ गुणाजी, रतन मासेकर, मनोहर किणेकर, अप्पासाहेब गुरव, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, रवी साळुंके आणि मदन बामणे अशा ८ जणांनी अर्ज सादर केले आहेत. तर ‘उत्तर’साठी शिवाजी मंडोळकर आणि अमर येळ्ळूरकर या दोघांनी अर्ज सादर केले आहेत. ‘ग्रामीण’साठी आर. एम. चौगुले आणि रामचंद्र मोदगेकर या दोघांनी निवड समितीकडे अर्ज सादर केले आहेत. अद्याप ग्रामीण मतदार संघात इच्छुक उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी शुक्रवार पर्यंतचा वेळ आहे.
खानापूर मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी ७ जणांपैकी मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, विलास बेळगावकर, निरंजन सरदेसाई आणि रुक्मांना झुंजवाडकर अशा ५ जणांनी अनामत रक्कम आणि प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत.
येत्या २ दिवसात निवड समिती चर्चा करून अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta