बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे ग्रामीण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या वननेस प्राईड येथे मोठ्या थाटामाटात करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी आणि समितीला विजयी करण्याचा निर्धार करत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला. ऍड. राजाभाऊ पाटील आणि आर. एम. चौगुले यांच्याहस्ते विविध मान्यवरांच्या आणि समिती नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. येत्या विधानसभा निवडणुकीत केवळ आणि केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच विजयाचा गुलाल उधळला जाईल, यासाठी प्रत्येक मराठी भाषिकाने आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजवर समितीमध्ये असलेले मतभेद मिटले असून राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाहात गेलेल्या प्रत्येक मराठी भाषिकाला समितीच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने जोमाने कार्य करणे गरजेचे आहे. आपला उद्देश हा सत्ता मिळविण्याचा नसून आपल्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी आणि अन्यायाविरोधात विधानसभेत आवाज उठविण्यासाठी मराठी भाषिक उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीपर्यंत कर्नाटकात मराठी भाषिकांचे डावलण्यात येणारे घटनात्मक हक्क मिळविण्यासाठी आपल्याला समितीच्या उमेदवाराला विजयी करणे गरजचे आहे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, आर. आय. पाटील, सुधीर चव्हाण, मदन बामणे, मनोज पावशे, सुनील अष्टेकर आदींसह अनेक नेतेमंडळी, मान्यवर, कार्यकर्ते आणि महिला वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta