बेळगाव : शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोलमडलेली बससेवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तात्काळ सुरळीत करण्यात यावी आणि आवश्यक ठिकाणी अतिरिक्त बसेसची सोय करावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभाग नियंत्रण अधिकारी वाय. पी. नाईक यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी उपरोक्त मागणी करण्यात आली. अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीत विस्कळीत बस सेवेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांना विशेष करून विद्यार्थी वर्गाची होणारी गैरसोय आणि त्यामुळे त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे अतिरिक्त बस गाड्यांसह प्रामुख्याने सांबरा, उचगाव, निलजी व बेळगुंदी या मार्गावरील बससेवा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.
परिवहन मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकी संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना माजी आमदार किणेकर म्हणाले की, बेळगाव तालुक्यातील बससेवा एकदम कोलमडली आहे. परिणामी सकाळी शाळेला जाताना आणि सायंकाळी घरी परत येताना विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यासाठी बेळगाव तालुक्यातील बससेवा सर्वच दृष्टीने सुधारावी. योग्य वेळेत बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात, यासाठी आम्ही आज अधिकार्यांची भेट घेतली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आणि नेहमीप्रमाणे बसेस कमी आहेत, सरकार निधी देत नाही, या तक्रारी आमच्या समोर मांडल्या, असे किणेकर यांनी सांगितले.
गेली दोन वर्षे कोरोमुळे विद्यार्थ्यांची शाळा बुडाली आहे. परंतु आता शाळा पुनश्च सुरू झाल्या आहेत. तेंव्हा विद्यार्थी आणि जनतेसाठी देखील बससेवा सुरळीत होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन बसेसची कमतरता असेल तर अतिरिक्त बसेस उपलब्ध करून द्याव्यात. बसेसच्या कमतरतेची समस्या दर महिन्याला आपण जिल्हा पालक मंत्र्यांच्या कानावर घालत असतो असे अधिकार्यांकडून सांगितले जाते. तेंव्हा जर जिल्हा पालक मंत्री याकडे दुर्लक्ष करत असतील तर बेळगावातील लोकप्रतिनिधींनी संघटित होऊन त्यांच्यावर दबाव आणून अतिरिक्त बसेस मिळून दिल्या पाहिजेत, ते त्यांचे कर्तव्य आहे. सध्या बससेवा सुरळीत करण्यासाठी आम्ही परिवहन मंडळाच्या अधिकार्यांना आठ दिवसांची मुदत दिली आहे. जर या कालावधीत बस सेवा सुरळीत झाली नाही तर आम्ही पुढच्या शनिवारी त्यांची पुन्हा भेट घेऊन जाब विचारणार आहोत, असेही माजी आमदार मनोहर किणेकर यांनी स्पष्ट केले.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी यावेळी बोलताना तालुक्यातील ग्रामीण भागाच्या बाबतीत सरकार दुजाभाव करत आहे असे सांगितले. बससेवा व्यवस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल व शैक्षणिक नुकसान होत आहे. ही समस्या किणेकर यांनी वरिष्ठ अधिकार्यांना पटवून सांगितले आहे. बससेवा सुरळीत करण्यासाठी आम्ही आठ दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर पुन्हा अधिक अधिकार्यांची भेट घेतली जाईल. एकंदर कोणत्याही परिस्थितीत बससेवेची समस्या निकालात काढण्याची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली आहे. तेंव्हा पालक आणि विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे, असेही सुंठकर म्हणाले. याप्रसंगी संतोष मंडलिक, सुनील अष्टेकर, मनोज पावशे, महेश जुवेकर आदींसह तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Check Also
सुवर्ण महोत्सवी “ज्वाला” दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन
Spread the love बेळगाव : प्रतिकूल परिस्थितीत सुरू झालेली “ज्वाला”ची वाटचाल महोत्सवी वर्षापर्यंत पोचली आहे. …