संपूर्ण मण्णूर गाव भगवेमय
बेळगाव : ‘मी ही निवडणूक पैसे कमवण्यासाठी लढवत नसून, सीमाभागातील मराठी भाषेवर होणारे अन्याय-अत्याचार थांबविण्यासाठी, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला बळकटी मिळावी यासाठी उभा आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रत्येक अडी-अडचणीत फक्त आणि फक्त समितीच पुढाकार घेते. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार मोठमोठी आश्वासने देत भेटवस्तू आणि पैशांचे वाटप करून मते विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी जनतेने त्यांच्या या भूलथापांना बळी न पडता ही निकराची लढाई जिंकण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्याच पाठीशी राहून मला प्रचंड मतानी निवडून द्यावे, असे आवाहन बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी केले.
म. ए. समिती उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारासाठी गुरुवारी सायंकाळी मण्णूर येथे भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. याप्रसंगी ते व्यासपीठावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, यावेळची निवडणूक बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी फक्त निवडणूक नसून सीमावासीयावरील अन्यायाविरोधात लढली जाणारी एक निकराची लढाईच आहे. ही लढाई जिंकूनच कर्नाटकी सरकारला मराठी अस्मितेचे दर्शन घडवायचे आहे. सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपविण्यासाठी कर्नाटक सरकार अतोनात प्रयत्न करत आहे. त्यांचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी समस्त मराठी बांधवांनी एकजुटीने लढण्याची हीच वेळ आहे. राष्ट्रीय पक्षातील उमेदवार मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी सर्व काही आपणच देत असल्याचा आव आणत आहेत. पण, जनता आता सुज्ञ झाली असून मतदानाच्या माध्यमातूनच त्यांना धडा शिकवेल. त्यासाठी पाचशे, हजार रुपयांच्या मागे लागून आपला स्वाभिमान गहाण न ठेवता समितीलाच मतदान करून महाराष्ट्रात जाण्याची आपली प्रबळ इच्छा दाखवून द्यावी, असे आवाहन केले. तर माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आपल्या भाषणात विराट संख्येने जमलेल्या सीमाबांधवांचे व ग्रामस्थांचे अभिनंदन करून 10 तारखेला होणाऱ्या निवडणुकीला देखील अशीच मराठी अस्मिता दाखवत कर्नाटक सरकारला हिसका दाखवावा. शिवाय आश्वासनांचे गाजर दाखविणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना थारा न देता समिती उमेदवार आर. एम. चौगुले यांनाच आपले बहुमोल मत देऊन प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रारंभी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आर. एम. चौगुले यांचे ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. तर कार्यकर्त्यांनी ‘बेळगाव कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ‘रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे, ‘जय भवानी, जय शिवाजी, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा गगनभेदी घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. सुवासिनीनी ठिकठिकाणी औक्षण करून चौगुले यांचे स्वागत केले. चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन झाल्यानंतर शिवरायांची आरती आणि प्रेरणामंत्र म्हणण्यात आला.
मा आमदार मनोहर किणेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना संपूर्ण सीमाभागातील वातावरण पाहता आर एम चौगुले हे विजयी झाले असून आपण प्रत्येकाने आणखीन जोर लावून मताधिक्य वाढवून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.
त्यानंतर प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. छ. शिवाजी चौकातून ही फेरी कलमेश्वर गल्ली, लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली मार्गे संपूर्ण गावात फिरून मतदारांना चौगुले यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, सुधीर चव्हाण यांच्यासह समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध युवक मंडळांचे कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी गोजगे गावामध्ये प्रचार पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर गावच्या वतीने माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी येळगे यांच्या हस्ते आर. एम. चौगुले यांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. ही प्रचार फेरी पदयात्रा गणपत गल्ली, होनगेकर गल्ली, मारुती गल्ली, हजारे गल्ली व इतर भागातून काढण्यात आली. या प्रचार फेरीमध्ये गावातील युवक मंडळी महिला भगिनी यांचा सहभाग होता प्रत्येकाने हातात भगवे झेंडे, शाल आणि भगव्या टोप्या परिधान केल्या.
Belgaum Varta Belgaum Varta