Tuesday , December 9 2025
Breaking News

उद्या दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील : जिल्हाधिकारी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व 18 विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन्स कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी केंद्र असलेल्या टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयात जमा करण्यात आली असून उद्या शनिवारी दुपारपर्यंत सर्व मतदार संघाचे निकाल जाहीर होऊ शकतील, अशी शक्यता जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बोलून दाखविली.

आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूममध्ये जिल्ह्यातील सर्व मतदार संघांमधील ईव्हीएम मशीन्स जमा करण्यात आली आहेत. सदर स्ट्रॉंग रूमची आज शुक्रवारी सकाळी पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते.

बेळगावचे आरपीडी महाविद्यालयातील मतमोजणी केंद्र हे संपूर्ण राज्यातील सर्वाधिक मतदान केंद्रांची मतमोजणी करणारे केंद्र आहे. थोडक्यात हे राज्यातील सर्वात मोठे मतमोजणी केंद्र असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी उद्याच्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती दिली. ते म्हणाले की, उद्या सकाळी ठीक 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.

प्रारंभी पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी होईल. अर्धा तास ही मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीन्समधील मतांची मोजणी केली जाईल. पोस्टल मतांची मोजणी झाल्याखेरीज ईव्हीएम मतमोजणी होणार नाही. एका मतदारसंघासाठी 11 टेबल ईव्हीएम यंत्राद्वारे होणाऱ्या मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत तर दोन टेबल हे पोस्टल मतदान मोजण्यासाठी राखीव आहेत. मतमोजणीसाठी एकूण 1188 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 360 मायक्रो ऑब्झर्वर असतील.

मतमोजणी केंद्रामध्ये थर्मल स्क्रीनिंग करूनच सर्वांना सोडले जाणार आहे त्याचप्रमाणे ओळखपत्र असल्याखेरीज कोणालाही मतमोजणी केंद्र आवारात प्रवेश दिला जाणार नाही. मतदान प्रक्रिया शांततेने सुरळीत पार पडावी यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात 144 कलमान्वये जमाबंदीचा आदेश जारी असणार आहे. मतदान केंद्राच्या 200 मी. परिघामध्ये हा आदेश जारी असणारा असून त्या ठिकाणी चौथ्या स्तरावरील सुरक्षा व्यवस्था तैनात असेल.

सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने केंद्रीय सीमा सुरक्षा दल पहिल्या स्तरावर, कर्नाटक राज्य राखीव पोलीस दल (केएसआरपी) दुसऱ्या स्तरावर आणि राज्य पोलीस तिसऱ्या स्तरावर कार्यरत असतील, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले.

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 187 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यापैकी 13 महिला उमेदवार तर 174 पुरुष उमेदवार आहेत. या सर्वांचे भवितव्य गेल्या बुधवारी ईव्हीएम मशीन बंद झाले असून सर्वांच्या नजरा आता निकालावर खिळल्या आहेत. खास करून उमेदवार, समर्थक आणि कार्यकर्ते यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. याबरोबरच पार्किंगची सोयही मतदान केंद्रापासून काही अंतरावर करण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *