बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत साऊंड सिस्टीमला थारा देऊ नये, चित्ररथासह मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा सूचना खडेबाजार विभागाचे सहायक पोलिस आयुक्त अरुणकुमार कोळ्ळूर (ACP) यांनी केल्या. मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी, विविध मंडळांचे कार्यकर्ते आणि पोलिस अधिकाऱ्यांची खडेबाजार पोलिस ठाण्यात बैठक झाली. त्यावेळी कोळ्ळूर बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शहरातील ऐतिहासिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. 27 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सहायक पोलिस आयुक्त कोळ्ळूर यांनी शहरातील शिवजयंती कशाप्रकारे साजरी केली जाते, याची माहिती घेतली. तसेच मिरवणुकीत साऊंड सिस्टीमला (DJ) थारा देऊ नये, मिरवणूक लवकर सुरू करून ती वेळेत पूर्ण करावी. धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, आदी सूचना केल्या.
महामंडळाला सहकार्य करा
27 मे रोजी सायंकाळी 5 वाजता नरगुंदकर भावे चौकातून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर विविध मंडळांचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होतील. मंडळांनी मिरवणूक वेळेत पार पडावी यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळाला सहकार्य करणे आवश्यक आहे. मंडळांनी मारुती गल्ली परिसरात अगोदर चित्ररथ उभे न करता नरगुंदकर भावे चौकातून मिरवणुकीत सहभागी व्हावे. ढोल-ताशा पथक व ध्वज पथकांनी एकाच ठिकाणी अधिक वेळ न थांबता पुढे सरकत ढोल-ताशांचा गजर करावा, अशी सूचनाही बैठकीत मांडण्यात आली.