बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले. शिवाय आजच्या समाजासमोर असलेल्या अनेक प्रश्नांना तरुणाईने अधोरेखित केले.
निवडणुकीमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे मिरवणूक भव्य दिव्य काढण्याची तयारी करण्यात आली होती. नरगुंदकर भावे चौक येथे पारंपरिक पद्धतीने पालखीचे पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी आमदार अभय पाटील, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे, म. ए.समिती नेते रमाकांत कोंडुसकर, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, प्रकाश शिरोळकर. विकास कलघटगी, मदन बामणे, आर. एम. चौगुले, ऍड. अमर यळ्ळूरकर आदी उपस्थित होते.
त्यानंतर मारुती गल्ली, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खुट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्लीमार्गे टिळक चौक, शनि मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. बापट गल्लीतील कालिका देवी युवक मंडळाने ‘भाषा टिकली तर धर्म टिकेल’ असा देखावा सादर करून आपण जीवनात इतर भाषांचाही वापर करतो, हे अधोरेखित केले. ताशिलदार गल्लीतील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात उडवलेली खिल्ली हा देखावा सादर केला. विशेष म्हणजे या चित्ररथाच्या सादरीकरणातील सर्व पात्रे ही महिलांनी साकारली होती. समर्थनगर,महाद्वार रोड, तानाजी गल्ली, पांगूळ गल्ली, कामत गल्ली, चव्हाट गल्ली, भुई गल्ली, टेंगिनकर गल्ली, मेणसे गल्ली, भातकांडे गल्ली, गांधीनगर, रामामेस्त्री आड्डा, फुलबाग गल्ली, संभाजी गल्ली, मराठा गल्ली आदी भागातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सादर करणारे देखावे सादर केले. देखावे पाहण्यासाठी सुरुवातीला गर्दी कमी होती. मात्र, रात्री आठ वाजता वेगवेगळ्या भागातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने देखावे पाहण्यासाठी दाखल होऊ लागल्याने मारुती गल्ली, गणपत गल्ली, किर्लोस्कर रोड आदी भागातील रस्ते गर्दीने फुलले होते. महापालिकेने उभारलेली प्रेक्षक गॅलरी देखील हाऊसफुल्ल झाली होती. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेली मिरवणूक पहाटेपर्यंत सुरू होती.
मराठमोळ्या वेशात महिला सहभागी
शिवाजी रोड येथील सह्याद्रीपुत्र युवक मंडळाचा देखावा सर्वप्रथम सुरू झाला. या मंडळाने शिवा काशीदचा पराक्रम आणि पावन खिंड हा देखावा अतिशय सुंदररित्या सादर केला. तर वेगळेपण जपणाऱ्या माळी गल्ली येथील बाल शिवाजी युवक मंडळाने बैलगाडीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवून मिरवणूक काढली. अनेक मंडळांच्या समोर महिला मराठमोळ्या वेशात सहभागी झाल्या होत्या.