बेळगाव : विधानसभा निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. निकालानंतर पंधरा दिवसांनी झालेल्या तालुका म. ए. समिती बैठकीत समितीविरोधी प्रचार केल्याचा ठपका ठेवत तिघांना बडतर्फ केल्याचा ठराव करण्यात आला. तो सर्वांसमोर वाचूनही दाखवण्यात आला. पण, आपल्यावर एकतर्फी कारवाई झाली आहे. चौकशी न करताच मनमानी प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून ठरावाबाबत आता वरिष्ठ काय निर्णय घेतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
शुक्रवारी (दि. २६) तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये समितीच्या पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीविरोधी काम करणाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात आला. पण, काही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव एक पदाधिकारी, जिल्हा पंचायत माजी सदस्या आणि त्यांच्या पतीवर बडतर्फीच्या कारवाईचा निर्णय घेण्यात आला. तसा ठराव करण्यात आला. पुन्हा तो सर्वांसमोर वाचून दाखवण्यात आला.
आता या ठरावाविरोधात बडतर्फीची कारवाई झालेल्यांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. आपल्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले असून आरोप सिद्ध न करताच कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, या मनमानी भूमिकेविरोधात आवाज उठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे समितीत हा वाद पेटत राहण्याची शक्यता आहे.
बडतर्फीच्या कारवाईबाबत वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.