Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव महापालिकेच्या आढावा बैठकीत समस्यांच्या मुद्यांवर वादळी चर्चा

Spread the love

 

बेळगाव : महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहराच्या विविध भागातील अनेक समस्या अजूनही जैसे थेच आहेत. त्याचप्रमाणे शहरातील नालेसफाईचे काम रखडण्यालाही सर्वस्वी महापालिकेचे अधिकारीच जबाबदार असल्याची टीका नगरसेवकांनी केली. सोमवारी महापालिका सभागृहात महापौरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आढावा बैठकीत शहरातील समस्यांच्या मुद्द्यावर वादळी चर्चा झाली. यावेळी संतप्त नगरसेवकांनी शहरातील प्रलंबित समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांची वागणूक योग्य नसल्याची तक्रार केली.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नालेसफाईला प्राधान्य दिले पाहिजे. मात्र नालेसफाईकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची टीका नगरसेवक गिरीश धोंगडी यांनी केली. पावसाळा तोंडावर आला असून सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत पुरवठा विभाग, आरोग्य विभाग यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रभागवार निरीक्षण करून निदर्शनात येणाऱ्या समस्या पावसाळ्यापूर्वीच सोडवाव्या, याचबरोबर शहरातील नालेसफाई करून नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अशी मागणी त्यांनी केली.

नगरसेवक – महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची 

महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथगतीने सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नगरसेवक रवी धोत्रे यांनी केली. यावर महापालिकेच्या अधिकारी लक्ष्मी निपाणीकर यांनी आक्षेप घेतला. बैठकीत वैयक्तिक कामावर चर्चा करणे योग्य नाही. जनतेच्या समस्या आणि त्यांची कामे होत नसल्याचे त्यांना सांगा असे त्या म्हणाल्या, यावरून नगरसेवक आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी नगरसेवक वैयक्तिक कामे घेऊन येतात हे विधान मागे घ्या, बैठकीत जनतेच्या समस्या निदर्शनास आणून दिल्यास ते वैयक्तिक कसे होऊ शकते असा प्रश्न नगरसेवक रवी धोत्रे यांनी उपस्थित केला.

शेवटी सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी यांनी बैठकीत जनतेच्या समस्यांखेरीज अन्य मुद्द्यांवर विषयांतर करू नये ही सूचना केली. अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या का सोडवता येत नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महापालिकेच्या अखत्यारीत घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुमारे १६० कचरा गाड्या खरेदी करण्यात आले आहेत. त्यापैकी ८० कचरा गाड्या अजूनही वापराविना धुळखात उभ्या असल्याची तक्रार नगरसेवक रवी धोत्रे यांनी केली. यावर महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी, महापालिकेला देण्यात आलेल्या कचरा गाड्यांसाठी चालकांची अडचण आहे. अनेकवेळा निविदा मागवण्यात आल्या मात्र कोणीही आले नाही, पण कचऱ्याची गाडी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल असे स्पष्ट केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास सर्वच वॉर्डांमध्ये अपूर्ण कामे केली आहेत. परिणामी शहरासाठी मंजूर करण्यात आलेले कोट्यावधींचे अनुदान वाया गेले आहे. तेव्हा कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदारीतून मुक्त करावे अशी टीका नगरसेवक हनुमंत कोंगाळी यांनी केली.

बैठकीत वीजवाहिन्या, पथदीप, कचरा समस्या, गटारी, उद्यान, पाणीपुरवठा, स्मशान व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा तपशील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांकडे मागितला. तसेच प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आणि सुविधा पुरविण्यासाठी किती खर्च केला याबाबत नगरसेवकांनी मुद्दा उपस्थित करत पालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

या बैठकीला महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, पालिका अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *