बेळगाव : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिकेत विकास आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दक्षिण विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या महिला कार्यकर्त्या शिवानी पाटील वॉर्ड क्रमांक 50 मधील विविध समस्यांसंदर्भात निवेदन सादर केले.
सदर निवेदनात वॉर्ड क्र. ५० मधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यांची डागडुजी करण्याकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. गटारी नसल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. या भागात सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. ड्रेनेज पाईपलाईन फुटली असल्यामुळे ड्रेनेजचे पाणी गटारीतून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी खराब झाल्या आहेत तर निकृष्ठ दर्जाच्या गटारी बांधकामामुळे गटारीचे पाणी नळाच्या पाईपलाईनमध्ये मिसळत आहे. त्यामुळे आनंदनगर, साई कॉलनी परिसरातील नागरिकांना ड्रेनेज मिश्रित पाणी पुरवठा होत आहे. परिणामी या भागातील नागरिकांना गॅस्ट्रो, कॉलरासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही भागात रस्त्याचे काम पूर्णपणे ठप्प आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित नगरसेविकेला विचारणा केली असता अरेरावीची उत्तरे देण्यात येत आहेत तर काही वसाहतीतील नागरिकांना तुम्ही आमच्या पक्षाला मतदान केलेले नाही त्यामुळे तुमच्या भागात कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार नाहीत, अशी उद्धट उत्तरे या भागातील नगरसेविका नागरिकांना देत आहे. अन्नपूर्णेश्वरी नगर या भागांमध्ये गटारी बांधलेल्या नाहीत त्यामुळे येथील सांडपाण्याचा निचरा होत नाही तसेच बळ्ळारी नाल्याची स्वच्छता केली गेली नाही. मागील १५ वर्षात गाळ काढलेला नाही. नाला पूर्णपणे जलपर्णीने वेढला आहे. परिणामी पावसाळ्यात या भागातील सांडपाणी रस्त्यावर उतरून परिसरातील घरातून पावसाचे पाणी शिरते. स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार कल्पना देऊन देखील या समस्या सोडविण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. तरी संबंधित समस्यांबाबत आपण लक्ष घालून या भागातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक रणजीत चव्हाण पाटील, महादेव पाटील, माजी नगरसेवक राजु बिर्जे, माजी नगरसेवक अनिल पाटील, शेतकरी नेते राजू मरवे, उमेश पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, किरण सावंत, जयदीप पाटील, प्रशांत भातकांडे, सागर पाटील, विशाल कंग्राळकर यांच्यासह समिती कार्यकर्ते उपस्थित होते.