बेळगाव : घरचा कर्ता पुरुष अचानक निधन पावल्यामुळे संकटात सापडलेल्या नंदीहळ्ळी येथील मयत मनोहर नागाप्पा चौगुले यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुप्रसिद्ध कायदे सल्लागार ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी 5000 रुपयांची आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे.
नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) येथील प्रगतशील शेतकरी मनोहर नागाप्पा चौगुले यांचे अलीकडेच आकस्मिक निधन झाले आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी मनोहर चौगुले शेतात राबून समाधानकारक कृषी उत्पन्न काढत होते मात्र ते अचानक दगावल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर संकट तर कोसळलेच आहे.
त्याशिवाय त्यांच्या तीन मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मयत मनोहर यांची पत्नी रेखा आणि वयोवृद्ध आई लक्ष्मी हे उभयता सध्या आपल्यापरीने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवत असले तरी नंदिनी, समर्थ आणि सर्वेश या मनोहर यांच्या तीन मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा आहे. याची दखल घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी आपल्या परीने मुलांच्या शिक्षणासाठी चौगुले परिवाराकडे 5000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे. ॲड. मारुती कामाण्णाचे यांच्यापासून प्रेरणा घेऊन ॲड. प्रताप यादव यांनी देखील चौगुले कुटुंबाच्या मुलांसाठी 10,000 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.
मयत मनोहर नागाप्पा चौगुले यांची तीनही मुले खानापूर येथील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतात. सदर शाळेचा नावलौकिक चांगला असल्यामुळे आपली मुले चांगले शिक्षण घेऊन मोठी व्हावी या उद्देशाने चौगुले यांनी मुलांना या शाळेत घातले असले तरी या शाळेची फी भरमसाट आहे.
त्या अनुषंगाने मयत मनोहर चौगुले यांच्या अडचणीत सापडलेल्या कुटुंबाला सेवाभावी संघ -संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा, असे आवाहनही ॲड. कामाण्णाचे यांनी केले आहे.
तरी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्यांनी आपली मदत मच्छे येथील खानापूर रोड महावीर सर्कल बस स्टॉप नजीक असलेल्या बँक ऑफ बरोडा मधील रेखा मनोहर चौगुले यांच्या एसबी एसी क्र. 63190100009912 या खात्यावर जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.