बेळगाव : चंदगड तालुक्यातील हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या कॅम्प येथील खान कुटुंबियांवर काळाचा घाला पडला आहे. हजगोळी येथील तिलारी जलाशयाच्या बॅक वॉटरमध्ये दोघे भाऊ बुडाले असून रेहान अल्ताफ खान (वय 15) आणि मुस्तफा अल्ताफ खान (वय 12) अशी त्यांची नावे आहेत.
चंदगड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव कॅम्प परिसरातील अल्ताफ खान आपल्या पत्नी व दोन मुलांसह आज शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हजगोळी येथील चाळोबा मंदिर परिसरात गेले होते.
याठिकाणी तिलारी जलाशयाचे बॅक वॉटर असते. त्या पाण्यात रेहान आणि मुस्तफा खेळत होते. पण, अचानक ते बुडाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात शोधाशोध सुरू केली. पण, अंधार आणि पावसामुळे शोधकार्यात अडथळा आला. त्यामुळे आज शोध थांबवला असून रविवारी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.
दरम्यान घटनेची माहिती कळताच गौस धारवाडकर सह कॅम्प भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते तिलारी धरण परिसरात दाखल झाले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta