बेळगाव (प्रतिनिधी) : मध्य प्रदेश -भोपाळ येथे झालेल्या 66 व्या नॅशनल स्कूल गेम्स 2022 ॲथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात बेळगावच्या चैतन्य श्रीधर कारेकर याने सुवर्णपदक पटकाविले.
चैतन्याने 110 मीटर अडथळ्याची शर्यत अवघ्या 14. 431 सेकंदात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले.
टिळकवाडी येथील जीएसएस विज्ञान महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण घेणाऱ्या चैतन्य कारेकर याने हे घवघवीत यश संपादन करताना बेळगावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खोवला आहे. चैतन्य याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतनगर-शहापूर, बेळगाव येथील तुकाराम महिंद्रकर संचालित बिट ब्रेकर्स डान्स अकॅडमीच्यावतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रंजन मरवे, जनसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि पत्रकार रवींद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल अवचारे उपस्थित होते.
चैतन्य कारेकर याने, बिकट आर्थिक परिस्थितीचा बाऊ न करता जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर निश्चित ध्येय गाठत त्याने बेळगावचा लौकिक वाढवून युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. अशा हरहुन्नरी खेळाडूकरीता बेळगावच्या क्रीडाप्रेमींनी मदतीचा हात पुढे करून भविष्यात उच्च ध्येय गाठण्यास त्याला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन रवींद्र जाधव यांनी यावेळी बोलताना केले.
सामाजिक कार्यकर्ते रंजन मरवे यांनी, चैतन्य कारेकर याने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले. तसेच त्याला ॲथलेटिक्स सरावाकरिता लागणारे किट, मदत म्हणून देण्याची ग्वाही दिली. भविष्यात त्याने या खेळात यशोशिखर गाठून बेळगावकरांचा लौकिक वाढवावा, असेही रंजन मरवे म्हणाले.
यावेळी रंजन मरवे यांच्या हस्ते चैतन्य कारेकर याचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
याप्रसंगी चैतन्य कारेकर याची आई श्रीप्रिया कारेकर, बहिण शर्वरी कारेकर तसेच बिट ब्रेकर्स डान्स अकॅडमीचे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. बिट ब्रेकर्स डान्स अकॅडमीचे संचालक आणि कोरिओग्राफर तुकाराम महिंद्रकर यांनी आभार मानले.