चौघांविरोधात गुन्हा दाखल
बेळगाव : बनावट कागदपत्र तयार करून बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अखत्यारितील सरस्वतीनगरमधील भूखंड विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी बनावट दस्ताऐवज तयार करून फसवणूक ल्याप्रकरणी उत्तर उपनोंदणी अधिकारी रवींद्रनाथ उडिवेप्पा हंचीनाळ यांनी मार्केट पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रणय रत्नाकर शेट्टी (रा. पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर), राहुल एम. मगदूम (रा. रामतीर्थनगर), शिवाप्पा वाय. मुचंडी (रा. सदाशिवनगर) यांच्यासह अन्य एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबात मार्केट पोलिस ठाण्यात मिळालेली माहिती अशी की, बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अखत्यारित सरस्वतीनगर येथील सर्व्हे क्रमांक 70 / 2 मधील चार गुंठ्याचा भूखंड इग्नेशियस फिलिप डिसोजा (रा. शांतीनगर, टिळकवाडी) यांच्या नावे आहे. त्यांनी हा भूखंड कुणालाही विकलेला नसताना 4 फेब्रुवारी 2023 रोजी उपनोंदणी कार्यालयात त्यांनी तो विकल्याची नोंद झाली आहे. यासंबंधी त्यांनी तक्रार केल्यानंतर उपनोंदणी कार्यालयातून चौकशी करण्यात आली. त्यावर डिसोजा यांचे छायाचित्र बनावटरीत्या कागदपत्रांवर चिकटवल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार चौघा संशयितांनी फसवण्याच्या उद्देशातून केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
त्यामुळे, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, असे फिर्यादीत म्हटले आहे. मार्केट पोलिसांनी 14 जून रोजी याची दखल घेत संशयितांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या सर्वांवर भादंवि कलम 420, 464, 465, 467, 468, 471 419 व सहकलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मार्केट पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.