बेळगाव : भारत सरकार आणि कर्नाटक सरकार यांच्या मार्गदर्शक सूचीनुसार आयुष्य खाते, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि अन्य विविध खात्यांतर्फे उद्या बुधवार दि. 21 जून रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत 9 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आयुष्य खात्याचे अधिकारी डॉ. श्रीकांत सुळधोळी यांनी दिली.
आंतर राष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आयुष्य खात्यातर्फे आज मंगळवारी सकाळी शहरामध्ये योगा जथ्थ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. सुळधोळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, बेळगाव सुवर्ण विधान सौध येथे उद्या 21 जून रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जाणार आहे. जिल्ह्यातील विविध योगा संघटनांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. योगासन फक्त एखाद दुसरा दिवस न करता दररोज केली पाहिजेत. ज्यामुळे आपण निरोगी सुदृढ आयुष्य जगू शकतो. आपल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या वेदांमध्ये देखील याचा उल्लेख आहे. आमच्या पूर्वजांनीही योगाचे आचरण केले होते. आज योगाचे महत्त्व ओळखून देश विदेशात याचा प्रसार होत आहे.
उद्याच्या आंतर राष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा जनजागृती संदर्भात आज आम्ही योगा जथ्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये सुमारे 1000 हून अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला होता. आता उद्या सुवर्ण विधान सौध येथे सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत आंतर राष्ट्रीय योग दिन साजरा केला जाईल. यावेळी सामूहिक योगा केला जाईल. त्याचप्रमाणे तज्ञांकडून योगासनाची प्रात्यक्षिके सादर करून त्याचे महत्त्व विशद केले जाईल, अशी माहिती डाॅ. श्रीकांत सुळधोळी यांनी दिली. याप्रसंगी जिल्हा आयुष्य खात्यासह अन्य विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta