गोवावेस, बेळगाव येथील सरकारी मराठी मुला -मुलींची शाळा क्र. 25 मध्ये शिक्षण घेतलेल्या 1997 -98 सालच्या बॅचमधील सातवीच्या माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर स्नेह मेळाव्यास 1997 -98 साली सातवीच्या मुला-मुलींना शिकविणाऱ्या शिक्षिका हेमलता कानशिडे, शिक्षक गोविंद कुंभार, बळीराम कानशिडे तसेच सध्या शाळेत सेवा बजावणारे शिक्षक आर. डी. बचनट्टी, पी. जे. डायस आणि शिक्षिका एस. पी. मोडक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गेल्या रविवारी झालेल्या या स्नेह मेळाव्याच्या प्रारंभी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून मोठ्या सन्मानाने त्यांना व्यासपीठावर विराजमान केले. त्यानंतर सर्व गुरुजनांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्याद्वारे त्यांना वंदन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी प्रथम शाळेचे दिवंगत शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रत्येक माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आपला परिचय करून दिला.
याप्रसंगी शिक्षिका हेमलता कानशिडे, सुमित्रा मोडक, शिक्षक गोविंद कुंभार आणि बळीराम कानशिडे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या शिक्षकांप्रमाणेच माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी देखील 1997 -98 साली आपल्याला शिकवलेल्या गुरुजनांबद्दल मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी 25 वर्षांपूर्वी शिक्षक आपल्याला कशा पद्धतीने शिकवत होते. अभ्यास न केल्यास अथवा कांही चुका केल्यास कशा प्रकारच्या छोट्या छोट्या शिक्षा द्यायचे ते सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्नेह मेळावा उत्साहात साजरा करताना उपस्थित सर्व माजी विद्यार्थी -विद्यार्थिनींनी लहानपणीचे छोटे छोटे खेळ खेळून आनंद लुटला. मेळाव्याची सांगता अखेर स्नेहभोजनाने झाली.
Belgaum Varta Belgaum Varta