बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी मण्णीकेरी कुटुंबीयांनी केली असल्याचे समजते.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, अशोक मण्णीकेरी यांना पहाटे 3 वाजता हृदयविकाराचा झटका आला. त्यांची पत्नी भूमी यांनी अशोक यांची बहीण गिरीजा यांना फोन केला असता त्या तात्काळ अशोक यांच्या घरी निघाल्या मात्र गिरीजा वाटेत असतानाच त्यांच्या पत्नीने पुन्हा फोन करून गिरीजा यांना हॉस्पिटलकडे येण्यास सांगितले. गिरीजा या हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अशोक यांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना कळविण्यात आले. दरम्यान गिरीजा यांनी डॉक्टरांना अशोकला हृदयविकाराचा झटका आला आहे का असे विचारता आधी डॉक्टरांनी मृत्यू हृदयविकाराने झाला नसल्याचे सांगितले नंतर पुन्हा डॉक्टरानी हृदयविकार झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले.
त्यामुळे अशोक यांच्या कुटुंबीय व निकटवर्ती यांनी संशय व्यक्त करून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बेळगाव येथील कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
अशोक मण्णीकेरी यांच्यावर सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अशोक मण्णीकेरी यांच्या पत्नी भूमी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कारात सहभागी झाल्या होत्या. पत्नी भूमी स्मशानभूमीत आल्यावर तिथे उपस्थितीत नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त करत अशोक यांच्या मृत्यूला पत्नी भूमी यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे अशोक मण्णीकेरी यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात पुढील तपासात निष्पन्न होईल.
Belgaum Varta Belgaum Varta