बेळगाव : बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, शेतकऱ्यांना एकरी ३० ते ३५ हजार नुकसान भरपाई द्यावी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र निधी ठेवावा, बेळगावात बायपास किंवा रिंगरोडऐवजी उड्डाणपूल बांधण्यात यासह विविध मागण्यांसाठी आज बेळगाव जिल्हा शेतकरी संघटनेसह इतर संघटनांच्यावतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेगीलयोगी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील म्हणाले, आज येथे न्यायासाठी आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही जमलो आहोत. नवीन सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनुकूल अर्थसंकल्प मांडावा, बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ३० ते ३५ हजार नुकसान भरपाई द्यावी. बेळगाव शहरानजीक रिंगरोड व बायपाससारख्या विकासकामांच्या नावाखाली गरीब शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीचा वापर न करता उड्डाणपुलासारखे प्रकल्प राबवावेत, शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आढावा घेण्याच्या सूचना द्याव्यात, अशा आमच्या मागण्या आहेत. ते मान्य न केल्यास मागील भाजप सरकारप्रमाणे काँग्रेस सरकारलाही धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे बेळगाव तालुका अध्यक्ष राजू मर्वे म्हणाले, मागील भाजप सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांनी योग्य धडा शिकवून काँग्रेस पक्षाला बहुमताने सत्तेवर आणले आहे. त्यामुळे नव्या सरकारने शेतकर्यांना डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी स्वतंत्र निधी ठेवावा. बेळगाव जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. रिंगरोड, हलगा – मच्छे बायपास प्रकल्प रद्द करून उड्डाणपूल बांधावा, स्त्रीशक्ती योजनेंतर्गत बेळगाव शहरानजीक बसने शेतीत जाणाऱ्या महिलांना चालक व वाहक मोफत बस प्रवास करू देत नाहीत ते थांबविण्याची मागणी केली.
यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना सादर केले. निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांनी ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी नेगीलयोगी रयत संघटना, कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आदी शेतकरी संघटनांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta