बेळगाव : वडगाव येथील ग्रामदैवत श्री मंगाई देवस्थान पासून मंगाईनगर पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. यामुळे मंगाईनगर येथील रहिवाशांना मंदिराकडे येण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर वळसा घालून यावे लागत आहे. यामुळे गैरसोय होत असून रहिवाशांना मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी मंगाई नगर रहिवाशी संघाने केली आहे.
वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा मंगळवारी ( ता. 11) होणार आहे. यात्रेच्या दिवशी मंदिरापर्यंत दिड नमस्कार तसेच लोटांगण घालण्यात येत असते. मात्र मंगाई नगर येथील नागरिकांना मंदिरापर्यंत येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. यामुळे येथील नागरिकांना मंदिराकडे जाण्यास वळसा घालून यावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत जिल्हा पालकमंत्री जिल्हाधिकारी, आणि महापालिका अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यात्रा संपल्यानंतर 15 दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांच्याकडून मिळाले आहे. संरक्षक भिंत उभारण्यात आल्याने मंगाई नगर येथील रहिवाशांना धामणे रोड, ब्रह्मलिंग नगर, विष्णू गल्ली मार्गे मंदिराकडे यावे लागत आहे. यामुळे यंदाच्या यात्रेत भक्तांची गैरसोय होणार आहे. या मार्गावरच महापालिकेने कचरा संकलन मोठ्या प्रमाणात केले असून रस्त्यावर महापालिका कचरा वाहतूक वाहनांची नेहमी वर्दळ सुरू असते. त्यामुळे या मार्गावर नेहमीच कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी सुटलेली असते. अशा परिस्थितीत भाविकांना यात्रेसाठी मंदिराकडे यावे लागणार आहे. यासाठी मंगाईनगरसह अन्य भक्तांना येथील मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta