बेळगाव : गावकरी आणि शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींची गैरसोय टाळण्यासाठी सीबीटी ते अलतगा अशी कायमस्वरूपी वस्तीची बससेवा सुरू करावी अशी मागणी कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना नुकतेच सादर करण्यात आले.
कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. पं. सदस्य चेतक कांबळे, प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, विनायक कम्मार, यशोधन तुळसकर, चेतन हिरेमठ आदींनी उपरोक्त निवेदन परिवहन अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाचे व्यवस्थापक अनंत शिरगुपकर यांना व जिल्ह्याचे अधिकारी डीटीओ के. के. लमाणी यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या 6 महिन्यापासून बेळगाव सीबीटी ते व्हाया अलतगा हंदिगनूर बस सेवा अचानकपणे बंद झाली आहे.
त्यामुळे प्रामुख्याने कंग्राळी, अलतगा, ज्योतीनगर परिसरातील शेकडो विद्यार्थी, कामगार, भाजी विक्रेते यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर अलतगा येथील लोकांना जवळपास 1 ते 1. 50 कि. मी. बस पकडण्यासाठी पायपीट करावा लागत आहे. त्याचप्रमाणे ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी स्वतः कांही दिवसापूर्वी जवळपास 50 ते 60 विद्यार्थी बस स्थानकावर बसची वाट बघत थांबल्याचे पाहिले होते.
विद्यार्थ्यांसाठी कोणतीही बस थांबत नसल्यामुळे स्वतः अध्यक्षांनी एक बस थांबवून सर्व विद्यार्थ्यांची सोय करून देण्याबरोबरच त्यांची व्यथा जाणून घेतली होती. त्या अनुषंगाने कंग्राळी खुर्द ग्रामपंचायतीने वरील प्रमाणे अलतगा गावासाठी वस्तीच्या बससह कामस्वरूपी बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta